ताज्या घडामोडी

अधिसंख्या पदावरील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्व सेवा विषयक लाभ -कोळी महासंघाचे अध्यक्ष व भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील अधिसंख्या पदावर वर्ग केलेल्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचारी बांधवांना व भगिनींना सेवानिवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी व इतर अंतिम सेवा विषयक लाभ देण्याचा तसेच त्यांना पुढेही अधिसंख्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असल्याचे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील यांनी सांगितले.
गेल्या 25 ते 30 वर्षापासून अनुसूचित जमातीच्या जागेवरती शासनाच्या शासकीय व निमशासकीय विभागात अनुसूचित जमातीतील कर्मचारी बांधव काम करीत असून सन 1995 ते 2003 पर्यंतच्या जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सन 2019 मध्ये अधिसंख्या पदे निर्माण करून या पदावर समाविष्ट केले आहे परंतु अधिसंख्या पदावरील कर्मचारी बांधवांना कोणतेही सेवाविषयक लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठा अन्याय झाला होता व यामुळे समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे आमदार पाटील यांनी जुलै महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदरचे कर्मचारी हे गेल्या 25 ते 30 वर्षापासून शासनाच्या विविध विभागात सेवेत असल्याने त्यांना सेवा निवृत्ती होईपर्यंत सेवेत कायम करावे व त्यांचे निवृत्तीनंतरचे सर्व सेवा विषयक लाभ मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना देण्यात यावे अशी मागणी केली होती व अनेक वेळा त्यांनी हा प्रश्न सभागृहात देखील उपस्थित केला होता. त्यानुसार काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता आमदार रमेशदादा पाटील गेल्या 12 वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी अधिसंख्या पदावरील कर्मचारी बांधवांना अधिसंख्या पदावर यापुढेही कायम ठेवण्यात येणार असून त्यांना निवृत्तीनंतरचे सर्व सेवा विषयक लाभ देणार असल्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतल्यामुळे अनुसूचित जमातीतील अनेक बांधवांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी विभागातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया एका महिन्यात सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 2014 साली मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेब या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांविषयी नेहमी सकारात्मक होते असे सांगून अनुसूचित जमातीतील बांधवांना सरकारने न्याय दिल्याबद्दल आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व समाज बांधवांच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!