ताज्या घडामोडी

आषाढस्य प्रथम दिवसें…!

Spread the love

*तस्मिनद्रौ कतिचितबलाविप्रयुक्त स कामी*
*नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।*
*आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं*
*वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥

ज्येष्ठ महिना संपून आषाढ सुरू झाला की, सर्वप्रथम आठवण होते ती महाकवी कुलगुरू कालिदासांची. पावसाचा ऋतू आपल्या पाऊलखुणा नजरेत भराव्यात इतपत हिरवळीच्या रूपानं अवनीवर पेरून ठेवतो. पाऊस शतधारांनी कोसळत असतो. बाहेर संततधार पावसाची रिपरिप सुरू असते आणि हातातल्या कपात गरमागरम चहा! चहाच्या प्रत्येक घोटासोबत मन आठवू लागतं.. कवी कालिदासांचं विरहकाव्य मेघदूत.

खरंतर..कालिदासांच्या ‘मेघदूत’ या विरहकाव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसें’ हा आजच्या दिवसासाठी प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनादेखील कालिदासाच्या मेघदूताची भूरळ पडल्याने त्यांना त्याचा अनुवाद केला होता, तो प्रसिद्ध आहे. आजच्या या दिवशी कविवर्य श्री कुसुमाग्रज यांचा समश्लोकी अनुवाद इथे लिहिण्याचा मोह मला तरी आवरणार कसा …?
*कृश हातातुन गळून पडले सोन्याचें कंकण*
*कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण !*
*आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी*
*नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण!*

जी अवस्था कविवर्य कुसुमाग्रजांची तीच कविवर्य बा.भ. बोरकरांची! आता कविवर्य बोरकरांनी केलेला अनुवादच बघा ना …
*शैली त्या तो प्रणयि इतुका काहिं मासांत मागे*
*की स्वर्णाचे वलय गळुनी कोपरा थेट लागे*
*आषाढाच्या प्रथमदिवशीं टेकला अद्रिरेखे*
*दंताघाती समद गजसा देखणा मेघ देखे !*

कविवर्य कुसुमाग्रज आणि बा.भ.बोरकर यांच्या अनुवादकांची गोडवी अजून वाढवतात कवयित्री शांताबाई शेळके! आतां शान्ताबाई शेळके यांनी केलेला अनुवाद बघू ..
*गिरिवर त्या महिने काही कंठित राही तो विरही जन*
*सखिविरहे कृश असा जाहला गळे करांतुनि सुवर्णकंकण*
*आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरी मेघ वांकला*
*टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला !*

आणि मग,
*’आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।* *वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।’*
या ओळीकडे विद्वानांचे लक्ष गेले. मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीनुसार कालिदासांचे कार्य हेच महत्त्वाचे मानून विद्वानांनी कालिदास दिन आषाढाच्या पहिल्या दिवशीच साजरा करायचे ठरवले. त्यानुसार आजच्या दिवशी कालिदास दिन साजरा होऊ लागला.
खरंतर दूतकाव्य लिहिणारे कालिदास हे पहिले कवी. त्यांच्या या दूतकाव्याची मोहिनी एवढी मोठी की, त्यानंतर अनेक दूतकाव्ये लिहिली गेली, पण काव्यप्रतिभेत ती मेघदूताजवळसुद्धा पोचली नाहीत. आणि मेघदूत हे अढळ राहिलं.

कृष्णशास्त्री चिपळुणकरांनी ‘मेघदूत’ प्रथम मराठीत आणले. चिंतामणराव देशमुखांसारख्या आधुनिक विद्वानांलाही मराठीत अनुवाद करण्याची भूरळ पडली. तसेच सुरूवातीला उल्लेख केल्याप्रमाणे बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट आणि शांता शेळके या श्रेष्ठ कवींनीही ‘मेघदूता’चा अनुवाद करत आपली प्रतिभा उजळवली.

*’जे दुःख आपण भोगलं ते इतरांच्या वाट्याला न येवो’* असा विचार करणे हे हिंदुस्थानी संस्कृतीचे वैशिष्टय़! कालिदासांनी याच श्रेष्ठ विचाराने मेघदूत सांगता केलेली आहे. १११ श्लोक म्हणजे ४४४ चरणांचे मेघदूत संपते तेव्हा वाचकांनाही सुखावणारे असते.

असं काय आहे या दूतकाव्यात ज्याची भल्याभल्यांना भुरळ पडावी….नेमकी काय आहे ही कथा…?
यक्षांचा प्रमुख असलेल्या कुबेराच्या शापामुळे प्रिय पत्नीचा विरह सहन करत मेघदूत या काव्यातील यक्ष रामगिरीवर एकेक दिवस कंठत आहे. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. अशा परिस्थितीत आषाढातील एखाद्या हत्तीसारख्या भव्य मेघाला पाहून हा यक्ष त्या मेघालाच आपला संदेश वाहक करतो. मेघदूताची ही अशी कथा आहे. यक्षाने मेघाला दूर हिमालयातील आपल्या प्रिय पत्नीकडे आपला संदेश घेऊन जाण्यासाठी सांगितलेला आपल्या घराचा पत्ता असेच मेघदूताचे स्वरूप आहे.

*’आषाढ’ म्हटले की, आठवतो ढगांच्या काळ्या पुजक्यांआडून गर्जना करत बसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासांची स्वतंत्र अभिजात साहित्यकृती असलेलं ‘मेघदूत’. निसर्ग, प्रदेश, माणसं याबद्दलचं कालिदासांचं भान आणि जाण, अवघ्या सृष्टीबद्दल वाटणारं प्रेम हे आपल्याला या आषाढात सदोदित जाणवत राहते आणि ‘मेघदूत’ मनात तरळत राहते.* *महाकवी कालिदासांच्या मनात एखादा विचार प्रकटला की, तो स्पष्ट करण्यासाठी अनेक शब्द त्यांच्यासमोर उभे राहत.या अफाट शब्द संपत्तीच्या जोरावर काळाच्या या प्रचंड ओघात महाकवी कालिदास आपल्या अमर साहित्य कृतीच्या रुपाने अचल उभे आहेत.*
जर्मन कवी गटे कालिदासांचे शाकुंतल हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचला असे म्हणतात. जोपर्यंत पृथ्वीवर मानव आहे, आपला भारत देश आहे तोपर्यंत कालिदासांची स्मृती अमर राहीलच. म्हणून ‘आषाढस्थ प्रथम दिवसे’ कवी कालिदास स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो.

*अरूण मोर्ये*
*सत्कोंडी, रत्नागिरी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!