देश विदेश

ज्योतिष हे छद्म-विज्ञान. ‘इग्नू’ चा ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने मागे घ्यावा : महाराष्ट्र अंनिसची मागणी

Spread the love

दिल्ली :-इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यंदाच्या वर्षापासून सुरु केलेला ज्योतिष विषयावरील अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे. ह्या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि,ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात आणि खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासा नुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टींचे प्रशिक्षण देण्याचा दावा करणारा ज्योतीष अभ्यासक्रम तातडीने रद्द करणे आवश्यक आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे कि,२००१ साली अटलबिहारी वाजपेयी शासनाने देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेतला होता. तो मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर मागे घेण्यात आला होता. डॉ.जयंत नारळीकर ह्यांच्या पासून अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी ह्याला विरोध केला होता. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या ५० दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही.वेन्कटरामन ह्यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे, ह्याची देखिल आठवण ह्या निमित्ताने करून देण्यात आली आहे.

इग्नूच्या ह्या अभ्यासक्रमात चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोल शास्त्रीय घटनाच्या विषयी अज्ञान आणि भीती पसरवण्याचे काम केले जात आहे .ग्रहणाच्या कालखंडात नीट आहार न घेतल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांच्या पूर्वी घडली असताना अशा गैरसमजांना बळकटी देणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टी ह्या लोकांच्या जीवाशी खेळ आहेत असे देखील ह्या पत्रकात पुढे म्हंटले आहे. एकाच वेळी ज्योतिषाला विज्ञान म्हणायचे आणि त्यावर आधारित उपाय सुचवायचे आणि शिकवताना मात्र ते कला माध्यमात अभ्यासक्रम म्हणून घालायचे हा देखील दिशाभूल करणारा प्रकार आहे. समाजातील ज्योतिष विषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असताना, ज्या विद्यापिठाच्या माध्यमातून ज्ञान मोकळे केले गेले त्या मुक्तविज्ञापीठाने असा अभ्यासक्रम सुरु करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे असे देखील ह्या मध्ये नमूद केले आहे.

मुहूर्ताच्या सारख्या कोणत्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टी आणि आपल्या कर्तृत्वाच्या पेक्षा ज्यांचा आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाशी काहीही सबंध नाही अशा गोष्टींच्या वर अवलंबून राहणारी मानसिकता ह्या मधून निर्माण होते आणि ते समाजाच्या साठी अत्यंत घातक आहे असे देखील ह्या मध्ये नमूद केले आहे.

करोनाच्या साथीने विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्व अधोरेखित होत असताना अशा स्वरूपाच्या अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देणे शासनाने टाळायला हवे असे देखील ह्या मध्ये म्हंटले आहे. महाराष्ट्र शासनाने अशा स्वरूपाच्या अवैज्ञानिक गोष्टींची अंमलबजावणी बाबत निदान महाराष्ट्रापुरती स्थगिती द्यावी अशी देखील मागणी ह्या मध्ये महाराष्ट्र अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते आणि छद्मविज्ञान अभ्यासक प्रा. प. रा. आर्डे, अंनिस बुवाबाजी संघर्ष राज्य विभागाचे प्रशांत पोतदार , नंदिनी जाधव, केदारनाथ सुरवसे, चंद्रकांत उळेकर,कमलाकर जमदाडे,भगवान रणदिवे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या द्वारे केली आहे.

तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वतीने विद्यापीठाने हा अभ्यासक्रम तातडीने स्थगित करावा यासाठी देशभरातील प्रमुख पंचवीस वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ञांच्या सह्यांचे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांना देण्यात येणार असल्याचे देखील ह्या मध्ये नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!