आरोग्य व शिक्षण

प्रशासनाचा भोंगळ कारभार; करदात्यांना नाहक त्रास

Spread the love

तळेगाव : येथील नगरपरिषद हद्दीत सत्यकमल कॉलनी भागातील तळेगाव – चाकण रोड वर सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

येथील सत्यकमल कॉलनीतील बुलेट शोरूम ते बालाजी मार्बल पर्यंत तळेगाव – चाकण महामार्गालगत भुयारी अथवा ओपन गटार नसल्याने पावसाचे घरगुती वापराचे तसेच ड्रेनेज लाईनचे सर्व पाणी मोकळ्या जागेत तसेच रस्त्यावर साचत असल्याने परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच वारंवार आजारी पडत आहेत. येथील सांडपाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून दोन ते अडीच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तळेगाव- चाकण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दुतर्फा करण्यात आलेल्या खोदकामामुळे हे सांडपाणी जास्त प्रमाणात साचत आहे

येथे काही ठिकाणी अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून अनेकांचे अपघातही झाले आहेत. या साचलेल्या सांडपाण्यामुळे तळेगाव – चाकण महामार्गालगत असलेल्या इमारतींमधील नागरिकांना इमारतीमध्ये जाणेही अशक्य झाले आहे. या पाण्यामुळे दुकानांमध्ये ग्राहक फिरकत नाहीत. या संदर्भात वारंवार नगर परिषदेकडे पाठपुरावा करूनही काम होत नसल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी आवाज न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार आणि नगरपरिषदेची उदासीनता याचा त्रास करदात्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. सगळीकडे डेंग्यूची साथ वाढत असताना अशा मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष का केले जात आहे? कामाची पहाणी ,आश्वासने खूप झाली आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!