क्रीडा व मनोरंजन

आत्माराम मोरे स्मृती कबड्डी: डिसोझा, मोडक स्कूल विजयी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे यांच्या  स्मृतीदिनापासून आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे सुरु झालेल्या १६ वर्षाखालील मुलांच्या आंतर शालेय विनाशुल्क कबड्डी स्पर्धेत अँटोनिया डिसोझा हायस्कूल – भायखळा, ताराबाई मोडक स्कूल-दादर संघांनी पहिल्या टप्प्यातील सलामीचे सामने जिंकले.  माझगावमधील स्पर्धेपूर्वी सहभागी खेळाडूंना एनआयएस प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांनी नियमांची माहिती व वॉर्म अपची प्रात्याक्षिके घेतली. त्यामधील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीना विशेष पुरस्कार देऊन आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विराज मोरे, माजी कबड्डीपटू सदन मोरे, क्रीडाप्रेमी साईल कदम व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.

वेदांत चिखले व हर्ष शेरकर यांच्या अप्रतिम खेळामुळे डिसोझा हायस्कूलने सर एली कदुरी स्कूल-माझगाव संघाविरुद्ध मध्यंतराला ३८-१२ अशी मोठी आघाडी घेतली. उत्तरार्धात अभिषेक शेजवळ व हर्ष मोरे यांना उत्तम सूर सापडल्यामुळे कदुरी स्कूलने सामन्यात रंगत आणली. परंतु पहिल्या डावातील पिछाडीच्या ओझ्यामुळे कदुरी स्कूलचा डिसोझा हायस्कूलने ५४-३० असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ताराबाई मोडक स्कूलने तब्बल ३० मिनिटे रंगलेल्या सामन्यात एन.एम.जोशी मुक्तांगण एमपीएस स्कूलवर ६७-६३ असा निसटता विजय मिळविला. मोडक स्कूलचे सुजल बोरीचा, आर्यन संसारे आणि मुक्तांगण स्कूलचे शिवम साळुंके, ओमकार भोसले चमकले. सामन्यानंतर देखील प्रशिक्षकांनी खेळात सुधारणा घडविण्यासाठी संघांना मार्गदर्शन केले.

पहिल्या टप्प्यासाठी विजय माझगाव क्रीडा मंडळाचे सहकार्य लाभले होते. स्पर्धेचा दुसरा टप्पा २१ फेब्रुवारीपासून घाटकोपर, तिसरा टप्पा २३ फेब्रुवारीपासून गोवंडी तर अंतिम टप्पा २७ व २८ फेब्रुवारीपासून दादर येथे होणार असून कोरोनाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन सहभागी संघांना अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!