ताज्या घडामोडी

धनगर समाजात चळवळ रूजलीच नाही _मा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली खंत

Spread the love

धनगर प्राध्यापक महासंघ* आयोजित ‘ समाज जागृती उपक्रमांतर्गत’ “आरक्षण आणि सामाजिक न्याय” या विषयावर बोलतांना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य *मा. लक्ष्मण हाके* यांनी अतिशय परखडपणे अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं.
महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची जमात असून सुद्धा धनगर जमात सत्तेपासून व विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांबच राहिली. असंघटितपणा, निरक्षरता, सततची भटकंती, इ. कारणांमुळे समाजाचा विकास झालाच नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. समाजाने वाचतं झालं पाहिजे; आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचला पाहिजे; तसेच धनगरी साहित्य सुद्धा वाचले पाहिजे; आणि काळ बदलला आहे त्यानुसार बदललं पाहिजे, अशा काहीशा टिप्स त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. धनगर समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत चळवळ पोचविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या संबंधी समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे. धनगर समाजाला निस्पृह व भावनेने काम करणाऱ्या व निस्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. धनगर समाजातील तरुणांनी असं नेतृत्व उभ केलं पाहिजे व सत्तेच्या प्रवाहात पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धनगर जमात शासनकर्ती जमात झाली पाहिजे. शाहु-फुले-आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बळीराजाची पुजा करणार्‍या बहुजन समाजाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, असे त्यांनी विविध दाखले देत पटवून दिले. महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर दिलेल्या साक्षीचा दाखला देऊन समाजबांधवांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य तळागाळातील शेतकरी व कष्टकरी बहुजन समाजाची प्रगती खऱ्या अर्थाने साध्य करावयाची असेल तर त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले जाऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले. धनगर समाजाने आपले संघटन मजबूत करून निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवून राजसत्तेमध्ये सामील होऊन बहुजनांचा विकास करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. हरी पिराजी धायगुडे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाला गौरवान्वित केल्याची आठवण त्यांनी समाजबांधवांना करून दिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या *हू वेअर द शुद्राज?* या ग्रंथाचा दाखला देऊन त्यांनी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता प्रतिपादित केली.
प्राध्यापक भरतीमध्ये धनगर समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनगर प्राध्यापक महासंघाचे निर्मिती करण्यात आली. प्राध्यापक भरतीबाबत महाराष्ट्र शासनाने नुकताच एक NT व OBC प्रवर्गांना अनुकूल निर्णय घेतला आहे. त्यात प्रा. लक्ष्मण हाके व प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांचा सिंहाचा वाटा असल्याने धनगर प्राध्यापक महासंघातर्फे प्रा. लक्ष्मण हाके व प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. ठरावाचा प्रस्ताव प्रा. जयश्री नवलकर यांनी मांडला तर प्रा. डॉ. धनराज धनगर यांनी अनुमोदन दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय व सूत्रसंचालन धनगर प्राध्यापक महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रत्नमाला वाघमोडे यांनी केले. आभार धनगर प्राध्यापक महासंघाचे सहसचिव प्रा डॉ धनराज धनगर यांनी मानले. या ऑनलाईन व्याख्यानासाठी धनगर प्राध्यापक महासंघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य त्याच प्रमाणे समाजातील बंधू-भगिनीमोठ्या संखेने उपस्थित होते .

प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी
सचिव
धनगर प्राध्यापक महासंघ (म. रा.)
मो. +919823197358

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!