क्रीडा व मनोरंजन

एमआरआरकेएस चषक क्रिकेट: नानावटी हॉस्पिटल उपांत्य फेरीत

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, सलामीवीर किशोर कुयेस्कर (२५ चेंडूत नाबाद ३७ धावा, ३ चौकार), नितीन रांजे (५ धावांत ३ बळी) व प्रतिक पाताडेची कप्तानपदास साजेशी अष्टपैलू कामगिरी, यामुळे नानावटी हॉस्पिटल संघाने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा ६ गडी राखून पराभव केला आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ एमआरआरकेएस’ रौप्य महोत्सवी चषक आंतर  हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कप्तान प्रदीप क्षीरसागरने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा पराभव टाळण्यासाठी शर्थीची झुंज दिली. कामगार नेते सचिनभाऊ अहिर व एमआरआरकेएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप यांनी स्पर्धेचे आयोजन शिवाजी पार्क मैदानात केले आहे.

नानावटी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर प्रदीप क्षीरसागर (२८ चेंडूत १७ धावा) व रोहन महाडिक (१२ चेंडूत १२ धावा) यांनी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला १ बाद ३३ धावा असा उत्तम प्रारंभ करून दिला. परंतु त्यानंतर नितीन रांजे (५ धावांत ३ बळी), प्रफुल तांबे (१२ धावांत २ बळी), प्रतिक पाताडे (१२ धावांत १ बळी), ओंकार जाधव (१० धावांत १ बळी), फरहान काझी (८ धावांत १ बळी) यांनी अचूक गोलंदाजी करून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा डाव १९.४ षटकात ६७ धावसंख्येवर गुंडाळला. इसाकी मुथूने ८ चेंडूत नाबाद ११ धावा काढल्या.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करतांना नानावटी हॉस्पिटलचे दोन प्रमुख फलंदाज १२ धावसंख्येवर माघारी पाठवीत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी हादरा दिला. परंतु सलामीवीर किशोर कुयेस्करने (२५ चेंडूत ३७ धावा) व प्रतिक पाताडेच्या (८ चेंडूत १० धावा) सोबत २४ धावांची तिसरी भागीदारी केली. परिणामी नानावटी हॉस्पिटलने १४ व्या षटकाला ४ बाद ७१ धावा फटकावून शानदार विजय संपादन केला. सुनील बांदवलकर (१३ धावांत २ बळी), प्रदीप क्षीरसागर (९ धावांत १ बळी), सुदेश यादव (१५ धावांत १ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. किशोर कुयेस्करला सामनावीर तर प्रदीप क्षीरसागरला ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा उत्कृष्ट  खेळाडूचा पुरस्कार क्रिकेट प्रशिक्षक डॉ. नितीन रेगे, क्रीडाप्रेमी मंगेश चिंदरकर, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, क्रिकेट पंच प्रदीप मसुरकर, क्रिकेटपटू अविनाश दुधाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!