ताज्या घडामोडी

मालगुंड येथे किशोरवयीन मुलींसाठी मोफत लैंगिक शिक्षण व आरोग्य विषयक कार्यशाळा

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे पंचायत समिती रत्नागिरी महिला व बालकल्याण समिती रत्नागिरी आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींसाठी मोफत लैगिंक शिक्षण, आरोग्य, कुटुंब नियोजन व कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होेते.
सदर कार्यशाळा पंचायत समिती रत्नागिरी सेस अंतर्गत व अनुसया महिला स्वयंसेवी संस्था रत्नागिरी यांचे मार्फत घेण्यात आली .या कार्यशाळेचे उदघाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती रत्नागिरीचे विद्यमान सदस्य व मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक गजानन उर्फ आबा पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य व अनुसया महिला स्वयंसेवी संस्था रत्नागिरीच्या अध्यक्षा निलम पालव यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर यांनी संस्थेला या सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ही संस्था ग्रामीण भागातील मुलींसाठी काम करीत आहेत हे काम फारच अनुकरणीय असून आपण असेच कार्य करीत राहा व आमच्या ग्रामीण भागातील मुलींसाठी विशेष करून माझ्या विद्यालयातील मुलींसाठी तुम्ही कधीही कोणताही कार्यक्रम आयोजित करा, माझी संस्था आपलं स्वागत करील असे अशा शब्दांत बंधू मयेकर यांनी संस्थेचे कौतुक केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व पंचायत समिती सदस्य आबा पाटील यांनीही या संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या विकासासाठी अधिकाधिक सक्रिय सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे आबा पाटील यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य व या संस्थेच्या अध्यक्षा निलम पालव यांनी केले. एकंदरीत संस्थेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामाचा विशेषतः महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या व राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
या कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक व संस्थेच्या सचिव मनाली साळवी तसेच शितप यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. किशोरवयीन मुलांच्या समस्या जाणून घेतल्या.मुलींनी मासिक पाळी संदर्भात नियोजन कसे करावे ? ग्रामीण भागातील अज्ञान, गैरसमज याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.त्याचबरोबर मुलींनी आत्मनिर्भर बनायला पाहिजे त्याकरीता स्व संरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत. कुटुंब नियोजन व कायदेविषयक अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना उद्बोधक माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यशाळेत विद्यालयातील इ. ८वी ते ११ वी च्या विद्यार्थ्यीनींचा सामावेश होता. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संस्थेच्या वतीने विद्यार्थीनींना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक विवेक परकर, निमंत्रित संचालक श्रीकांत मेहेंदळे, प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ पाटील, जेष्ठ शिक्षक नितीन मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले तर आभार नेत्रा मोहित यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!