ताज्या घडामोडी

जलसंपदा विभागाच्या वतीने आष्टयासह ५ गावातील क्षारपड जमीन सुधारण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवित आहोत-ना.जयंत पाटील

Spread the love

आष्टा दि.१३ प्रतिनिधी
आपण जलसंपदा विभागाच्या वतीने आष्टयासह ५ गावातील क्षारपड जमीन सुधारण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवित आहोत. या प्रकल्पात सरकार ८० टक्के खर्च करणार असून लाभार्थी शेतकऱ्यांनी २० टक्के खर्च करायचा आहे. आपण आपल्या गावात स्थानिक समित्या स्थापन करून लाभार्थींना योजना समजून सांगा, लवकर पैसे उभा करा म्हणजे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करता येतील,असा विश्वास राज्याचे जल संपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी आष्टा येथे बोलताना व्यक्त केला. शेतकऱ्यांना कित्येक वर्षांपासून भेडसाविणारा क्षारपड जमीन सुधारण्याचा प्रकल्प ना.जयंतराव पाटील यांनी विशेष प्रयत्नातून हाती घेतल्याने आष्टयातील शेतकऱ्यांनी ना.पाटील यांचा सन्मान केला.
आष्टा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत पथदर्शी भूमिगत चर योजनेतील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पाटबंधारे संशोधन व विकास संचानालयाचे अधिक्षक अभियंता बापूसाहेब गाडे, कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी,संचालक वैभव शिंदे,माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माणिक शेळके,राजारामबापू दूध संघाचे संग्राम फडतरे,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश रुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ना. पाटील म्हणाले,आष्टा शहरातील तीन विभागातील १७५० एकर जल संपदा विभागाच्या वतीने सुधारणा करण्यात येणार आहे. याचा २ हजार ५७ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी १३ कोटी ४५ लाख रुपये खर्च आहे. यातील ८० टक्के खर्च सरकार करणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी एकरी १५ हजार ३७१ रुपये भरावयाचे आहेत. ज्यांना शक्य आहे,त्यांनी रोख रक्कम भरावी. ज्यांना अडचणी आहेत,अशा शेतकऱ्यांच्या साठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने दीर्घ मुदती चे शून्य टक्के व्याजाचे कर्ज देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा. या प्रकल्पातून २-३ वर्षात क्षारपड जमिनी सुधारणा होऊन २-३ पिढ्यांचा प्रश्न सुटणार आहे.
वैभव शिंदे म्हणाले,आपल्या आष्टा शहरात क्षारपड जमीन मोठ्या प्रमाणात आहे. ना.जयंतराव पाटील जल संपदा खात्याच्या वतीने क्षारपड जमीन सुधारणेचा पथदर्शी प्रकल्प राबवित आहेत. यामध्ये ८० टक्के खर्च सरकार करणार आहे,तर २० टक्के शेतकऱ्यांनी करायची आहे. ही रक्कम उभा करण्यास आम्ही शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा सेवा सोसायटीच्या वतीने शून्य टक्के किंवा अल्प व्याज दरात कर्ज देऊ.
बापूसाहेब गाडे म्हणाले,ज्या भागात खाजगी व सरकारी उपसा जल सिंचन योजना आहेत,त्या भागात क्षारपड जमीनी सुधारणा करता येणार नाही असा १९८१ चा आदेश आहे. ना.जयंतराव पाटील यांनी २०२० साली त्यामध्ये बदल करून केला आहे. सध्या आम्ही जिल्ह्यातील ५ गावात पथदर्शी प्रकल्प राबवित आहोत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास आपल्या उर्वरित गावासह संपूर्ण राज्यात वापरला जाणार आहे.
प्रिया लांजेकर म्हणाल्या,आपला भाग सुपीक होता. मात्र उसाच्या अतिरिक्त पाणी व रासायनिक खत वापराने एकेकाळी सोने पिकविणारी काळी आई आजारी पडली आहे. आपणास त्यावर उपाय करायला हवा. आष्टा येथे १७५० एकर क्षारपड जमीन सुधारणा करणार आहोत. त्याचा २०५७ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. योजनेचा खर्च १३ कोटी ४५ लाख खर्च आहे. या योजनेत प्रति एकर १५ हजार ३७१ खर्च येणार आहे.
यावेळी अप्पर तहसिलदार सौ.धनश्री भांबुरे,जेष्ठ नेते रघुनाथ जाधव,युवक राष्ट्रवादीचे शिवाजी चोरमुले,विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष राज आटूगडे,माजी नगरसेवक जगन्नाथ बसुगडे,अर्जुन माने,उपअभियंता राहुल घनवट,राजेंद्र गाजी,राजारामबापू साखर कारखान्याचे डी.एम.पाटील,संतोष जंगम यांच्यासह आष्टा येथील विविध विभागा तील शेतकरी उपस्थित होते.
प्रारंभी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक माणिक शेळके यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.आष्टा येथे जलसंपदा विभागाच्या वतीने क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत भूमिगत चर योजनेतील शेतकऱ्यांशी संवाद करताना ना.जयंतराव पाटील. समवेत विजयराव पाटील,वैभव शिंदे,दिलीपराव वग्याणी,विराज शिंदे, बापूसाहेब गाडे,प्रिया लांजेकर,झुंझारराव पाटील,माणिक शेळके,संग्राम फडतरे व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!