ताज्या घडामोडी

कुठलाही कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वप्नातही अपमान करू धजणार नाही.

Spread the love

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्तवाहिनीतल्या चर्चासत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची केलेली वक्तव्य, ही छत्रपतींचा अपमान करणारी आहेत अशी अफवा पसरवून भारतीय जनता पक्षाला टीकेचा धनी करणाऱ्यांना उत्तर देताना इतकच सांगायचे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वप्नातही अपमान करू धजणार नाही. मात्र सुधांशू त्रिवेदी जे बोलले त्या विषयावरती बाळासाहेब ठाकरेंचे वडील थोर समाज सुधारक ‘प्रबोधनकार ठाकरे’ यांनी महाराष्ट्रभर व्याख्यान देऊन शिवछत्रपतींच्या चारित्र्यातला तो पैलू उजेडात आणला होता. त्या व्याख्यानाचा विषय होता ‘दगलबाज शिवाजी’ याबाबत सविस्तर सांगताना प्रबोधनकार ठाकरेंच्या ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातील उतारा खाली उद्रृत करत आहे.
प्रबोधनकार म्हणतात वाचक कदाचित हे विशेषण शिवरायाला लावल्याबद्दल माझ्यावर गुरगुरतील पण थांबा, ही मजेदार कथा तर आधी वाचा. वसंत व्याख्यानमाला जागोजाग फुलल्या होत्या. एक दिवस माझे स्नेही कै. गोपीनाथराव पोतनवीस आणि भोरचे शिवप्रेमी शेटे बंधू माझ्याकडे आले. ”भोरला वसंत व्याख्यानमाला चालू आहे तुमच एक व्याख्यान यंदा तेथे व्हावे यासाठी आमंत्रण द्यायला आलो आहोत विषय कोणता”?
प्रबोधनकार -विषय दगलबाज शिवाजी.

एवढे शब्द ऐकताच शेटे बंधू दचकले, ”काय हे केशवराव. अहो तुम्ही तर शिवरायांचे कट्टर भक्त आणि ही भाषा”!
प्रबोधनकार- होय! म्हणूनच म्हणतो दगलबाज शिवाजी
तिघांनी खूप खल केला पण मी आपला हेका सोडला नाही, निराशाना तिघेही माडी उतरून गेले दोनच मिनिटात गोपीनाथराव परत आले ”हे काय सिक्रेट आहे केशवराव?”

प्रबोधनकार – अर्जुन बगलबाज होता कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता तो वाकड्या दाराला वाकडी मेढ समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता. ‘दगलबाज’ आणि ‘दगाबाज’ यातला भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे ‘डिप्लोमॅट’ दगाबाज म्हणजे ‘स्ट्रेचरस’ इरसाल, मुत्सद्दी, द गलबाजच असावा लागतो कळले?
गोपीनाथ रावांनी शेटे बंधूंना वर बोलवलं, आणि म्हटलं, ‘बस ठरलं विषय दगलबाज शिवाजीच’ ते बिचारे दोघे त्यांच्याकडे पाहतच राहिले ”अरे गोपीनाथराव तू पण बाटलास? बरं, होऊन जाऊ द्या तुमच्या मनासारखं. भाषण ऐकणारे देतील न्याय. आमचं काय!”
**भोर शहरात खळबळ उडाली**
तेथील व्याख्यानमालेच्या बोर्डावर वक्ते- प्रबोधनकार ठाकरे, विषय- दगलबाज शिवाजी, असं खडूने लिहिण्यात आलं. काही मंडळींना चिड आली त्यांनी तो क्रम बदलून वक्ते- दगलबाज ठाकरे, विषय- प्रबोधनकार शिवाजी असा दोन-तीन वेळा बदल केला. व्यवस्थापकांनी लिहावे आणि चीडखोराने ते बदलावे असा प्रकार संध्याकाळपर्यंत चालला होता. मेहंदळे यांच्या बसमधून वक्ते महाशयांची स्वारी भोरला निघाली. कात्रज चा बोगदा ओलांडून मैल भर बस गेली असेल नसेल, तोच गडगडाट झाला. एकदम आकाशात काळे ढग जमा झाले. पाऊस धो-धो कोसळू लागला. तशात एकाएकी बस गाडी ही खटकून थांबली, आता? बिचारा मेहेंदळे तसाच पुण्याकडे जाणार एका गाडीने, ”एका तासात दुसरी बस घेऊन येतो” म्हणून सांगून गेला खरा. आम्ही सारे बसलो पावसाचा तडाखा सोशित सगळे भिजून चिंब झाले. खरोखर एका तासातच नवी गाडी आली.व्याख्यान संध्याकाळी ७ चे आम्ही तिथे चिंब अवस्थेत गेलो ९ वाजता श्रीराम मंदिराच्या सभा मंडपात सभा भरली.गर्दी चीकार जाहिरातच तशी झाली होती ना! दीड तास व्याख्यान झाले.
**बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी**
छत्रपती शिवरायांच्या समग्र चरित्रातील त्याच्या ठळक पराक्रमांच्या घटनांवर, दरप्रसंगी वाकड्या दरात वाकडी मेढ ठोकून कशी त्याने मुकाबल्यांचा फडशा पाडला, याचे तात्विक विवेचन भरपूर केल्यावर व्याख्यानाचा समारोप मी कसा केला-
”बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रम्हांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफजलखाना पुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली तर, अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू? या शूद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याला बगल मारून पळून पाहणारा बगलबाज अर्जुन पहा. आणि भेटीचे ढोंग करून दगा द्यायला आलेल्या दगलबाज खानाला युक्ती न गारच करणारा कर्तव्य तत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्या कर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. खानाला ठार मारल्याशिवाय किंवा त्याच्या हाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्याशिवाय, त्या मुकाबल्याचा निकालाच लागणार नव्हता. अर्थात मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीत शिवाजी प्रतापगड चढला आणि त्याच्या लोकोत्तर प्रसंगावधानानं त्यानं अशक्य घटना शक्य करून दाखवली. हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणं, अथवा खानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्ग शिवाजी पुढे नव्हता. ते कर्तव्य मोठ्या कुशलतेने पार पाडून ‘योग: कर्मसु कौशलम’ या गीतोक्तीप्रमाणे ‘दगलबाजातील योगीराज’ (ए सुप्रीम डिप्लोमॅट) ही आपली कीर्ती आजारामर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितले अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे हे सप्रमाण सिद्ध केलं दगलबाज शिवाजीनं. बगलबाज अर्जुनाने नव्हे, गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाही, तर शिवाजीने फेडले, महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धी प्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्रीकृष्णाला बगलबाज अर्जुन अपेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्यांनी अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही. अर्थात यत्र योगेश्वरः कृष्ण: श्लोक यापुढे-
// यत्र योगेश्वर: कृष्ण: यत्र शिवराय भूपति:
तत्र श्रीवीजयो भूतिध्रुवा नितीर्मतीमर्म // असाच वाचला पाहिजे. अखेरीस, कोणते विशेषण लावून छत्रपती शिवरायांचा जयजयकार करायचा, ते सभाजनांवर सोपवून मी आपली रजा घेतो.” एकमुखाने सभासस्थानी गर्जना झाली, दगलबाज शिवाजी महाराजांचा जयजयकार असो
**सगळीकडून आग्रहाची मागणी **
भोरचे व्याख्यान आटपून मी परतत असताना अनेक स्त्री- पुरुषांनी मला घेरल नि काय वाटेल ते करून आजचं व्याख्यान समग्र छापून प्रसिद्ध करा असा आग्रह केला. या सार्वजनिक आग्रहाला खुद्द शेटे बंधूंनी जोरदार पाठिंबा दिला ”खरोखर केशवराव” ते म्हणाले, दगलबाज नि दगाबाज या दोन शब्दातला भेदच आजवर आमच्या नजरेत कोणी आणला नव्हता. छत्रपती शिवरायांच्या राजकारणी चारित्र्यातील कर्मयोगाचा अस्सल स्वरूप असतो मी आज आम्हाला समजावून दिलं हे व्याख्यान छापून आलंच पाहिजे” पुण्यात आल्यावर लगेच बाहेर पडणाऱ्या प्रबोधनच्या अंकात मी ते समग्र लिहून छापलं.अंक बाहेर पडताच, खुद्द पुण्यातच त्या अंकाला सारखी मागणी येऊ लागली. प्रबोधन कचेरीसह आणि माझं तोंड चुकून कधी न पाहणारे गृहस्थ ही अंकासाठी छाप छापखान्याची पायरी चढले. अंक बहुतेक संपत आले होते तेव्हा मागणीचे तोंड मिटवण्यासाठी ४९पानांची पुस्तिका छापण्यासाठी कोकाटे छापखान्यात पाठवली. पाच हजार प्रति छापून एक आणा किमती विक्रीला ठेवली.
अशी दगलबाज शिवाजीची प्रबोधनकारांनी लिहिलेली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्यासाठी देवच पण महाराजांना देवत्व बहाल करून त्यांच्या माणूस म्हणून त्यांनी गाजवलेल्या असामान्य कर्तुत्वाचा आदर्श आपण घ्यायचा नाही का? त्यांच्याविषयी बोलताना नेमकं कोण काय बोलल? हे समजून न घेता महाराजांचा अपमान झाला अशी टीकाच आपण करत बसलो तर शिवचरित्रा वर अधिक संशोधन करायला महाराजांची थोरवी वेगवेगळ्या पैलूंनी मांडायला पुढची पिढी धजावेल काय? शिवचरित्रावर संशोधन करणं, शिवचरित्र विषयी लिहिणं, बोलणं,वाचणं हे अधिकाधिक व्हावं असं वाटत असेल अनाठाई राजकीय टीका करणं घेणं बंद केलं पाहिजे. अर्थात संशोधन करणाऱ्यांनी लिहिणाऱ्या बोलणाऱ्यांनी पूर्वग्रह दूषित असू नये हेही तितकंच खरं पण सुधांशू त्रिवेदींच्या बाबतीत तसं नाही हे सूर्यप्रकाशा इतक स्वच्छ आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्र समोर जे मांडलं तेच सुधांशू त्रिवेदी टीव्हीच्या चर्चेत बोलले. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून त्याच्या तोंडाला काळं फासून, महाराष्ट्रात परत आल्यानंतर औरंगजेबाला त्यांनी पत्रे पाठवली हा दगलबाजीच्या राजकारणाचाच एक भाग संभाजी राजेंना दिलेली मनसबदारी ची जबाबदारी तातडीने मिळावी आणि आपली परवानगी न घेता निघून आलो त्याबद्दल दिलगीर आहे असा अत्यंत धूर्तपणे महाराज औरंगजेबाला पत्रातून लिहीतात महाराज नेमकं काय करतायेत हे समजत असून देखील हात चोळल्या शिवाय औरंगजेब काहीही करू शकला नाही. महाराजांना संभाजी राजेंच्या मनसबदारीची कुमक पदरात औरंगजेबाचे दात त्याच्याच घशात घालत त्या कुमकेचा वापर हिंदवी स्वराज्याच्या वाढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हा खरा इतिहास आहे, हे आहेत खरे दगलबाज छत्रपती शिवाजी महाराज,या देशातला कोणीही देशभक्त व्यक्ती विशेषतः भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता स्वप्नातही कधी महाराजांचा अपमान करू धजावणार नाही. भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीतून मार्ग निघू शकतो. भगवान श्रीकृष्ण देखील रण सोडून पळून गेला होता म्हणून आपण त्याला रणछोडदास म्हणतो मग तो पराभूत झाला असं म्हणायचं का? महाराजांनी दगलबाजी करत डिप्लोमसी करत अनेक वेळा आपल्या शत्रूंना झुलवत ठेवलं आणि यश मिळवलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानातून आपली सुटका करून घेत हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी आपलं जीवित कार्य वाहून घेतलं अंदमानच्या जेलमधून सुटल्यानंतर रत्नागिरी पतीत पावन मंदिराची स्थापना केली. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा अस्पृश्यता मिटवण्याच्या चळवळीला सुरुवात केली.हिंदू महासभेच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रीय राजकारणात हिंदूंवर अन्याय होतोय हे लक्षात घेऊन राजकीय हालचाली करायला सुरुवात केली. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अज्ञानापोटी राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर समाज माध्यमातून जे काही व्हायरल होत आहे. ते अतिशय उथळ आहे. या निमित्ताने एकच आवाहन करायचे आहे की सावरकरांवर टीका करत असताना समग्र सावरकर आधी वाचा आणि मग बोला, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी करून घेणाऱ्या सावरकर कुटुंबावर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करताना आपण देशासाठी काय केलं आहे? याचा विचार नक्की झाला पाहीजे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या दगलबाज शिवाजीचा दाखला देत सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्यांना हे उत्तर पुरेसं आहे असं मी मानतो.छत्रपती शिवाजी महाराज हा देव्हाऱ्यात ठेवण्याचा नाही तर डोक्यात घेण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमची प्रेरणा होते आजही आहेत,उद्याही राहतील पुढच्या हजारो पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा देत राहतील. त्यांची इतर कुणाशीही तुलना कधीच शक्य नाही. यानिमित्ताने दगलबाज शिवाजी समजून घेतला तर आयुष्यात आपल्या सर्वांनाच अधिक प्रगती करता येईल. आणि सुधांशू त्रिवेदी यांचे वक्तव्य हे महाराजांचा अवमान करणार नसून त्यांची महती सांगणारच आहे हे दाखवणारा प्रबोधनकारांचा ‘दगलबाज शिवाजी’ देखील सर्वांच्याच लक्षात राहिला पाहिजे
अजित चव्हाण, प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!