ताज्या घडामोडी

रावेत येथील पीसीसीओईआर महाविद्यालयाचे एनएसएस शिबिर पाथरगाव मध्ये संपन्न

दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ड्रोन व रोबोटची प्रात्यक्षिके

Spread the love

प्रतिनिधी श्रावणी कामत

पिंपरी, पुणे (दि. २२ फेब्रुवारी २०२४):  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च चे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच पाथरगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे पार पडले.


सात दिवसाच्या या शिबिरात गाव स्वच्छता मोहीम, मतदार जनजागृती, आयुष्यमान भारत सर्वे, वृक्षरोपण, जलसंवर्धन, व्याख्यान, गडकिल्ले भेट, महिला व मुलांसाठी प्रबोधन आणि मनोरंजनात्मक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या दरम्यान रोज सकाळी योगा-व्यायाम, अनुभव कथन, राष्ट्रीय सेवा योजना ची प्रार्थना, सायंकाळी विविध सामाजिक विषयावर गटचर्चा व गावातील शाळेत जाऊन तिथल्या मुलांना नवनवीन गोष्टी शिकवणे व खेळ घेणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले.

शिबिराची सुरुवात पहिल्या दिवशी गाव स्वच्छता मोहिमेने झाली, सायंकाळी ग्रामस्थांसाठी “जलसाक्षरता” या विषयावर प्रवीण मोरे यांचे व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी गावातून मतदार जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली व सायंकाळी दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चाइल्ड इनोव्हेशन” अंतर्गत ड्रोन व रोबोटची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तरे देऊन संवाद साधला.
तिसऱ्या दिवशी पाथरगाव शेजारील पिंपळोली गावातील जि. प. प्राथमिक शाळेस आणि आचार्य वीरेंद्र यांच्या आश्रमास भेट दिली व त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनशैली व आहार यावर मार्गदर्शन केले. सायंकाळी शेतकऱ्यांसाठी “इंद्रायणी भात लागवड” या विषयावर नविनचंद्र बोऱ्हाडे यांचे व्याख्यान झाले. चौथ्या दिवशी आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या “आभा कार्ड” संदर्भात सर्वे करण्यात आला. तसेच वृक्षरोपणासाठी सुद्धा सर्वेद्वारे ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात आली. सायंकाळी महिलांसाठी “होम मिनिस्टर” चा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पाचव्या दिवशी “३५० वा शिवराज्याभिषेक” या कार्यक्रमा अंतर्गत लोहगड किल्ला आणि प्रति पंढरपूर व पवना धरण येथे भेट दिली. सायंकाळी प्रसिद्ध शिव व्याख्याते डॉ. प्रमोद बोऱ्हाडे यांचे यावर व्याख्यान झाले. सहाव्या दिवशी गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पेंटिंग काढण्यात आले. गावातील विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वयंसेवकांनी लोकसंख्या नियंत्रण, सायबर सुरक्षा यावर पथनाट्य सादर केले. शेवटच्या दिवशी सर्व गावातील तसेच शिबीरा अंतर्गत वापरलेल्या जागांची स्वच्छता करण्यात आली. युवा उद्योजक सुशांत बालगुडे यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प अधिकारी म्हणून प्रा. डॉ. महेंद्र साळुंके यांनी काम पाहिले. प्राचार्य डॉ. हरिष तिवारी आणि प्रा. तुषार गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले.

समारोप प्रसंगी पीसीटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी आयोजनाबद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!