शिराळा बायपास नाक्यावर स्वच्छतागृह उभारा शिराळा तालुका प्रवासी संघाची मागणी
शिराळा प्रतिनिधी
शासकीय तंत्रनिकेतन (आयटीआय)- शिराळा बायपास येथील ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर मुंबई- पुणेकर प्रवाशी, विशेषतः महिला प्रवाशी, लहान मुले यांच्याकरिता स्वच्छतागृहाची उभारणी करावी. तसेच स्वच्छतागृहाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत फिरते स्वच्छतागृह देण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिराळा तालुका प्रवासी संघाने शिराळा नगरपंचायत प्रशासनास दिले.
सदर ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिला तसेच इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने उघड्यावर लघुशंकेस जाण्याची दुर्दैवी वेळ येत आहे. यामुळे महिला सुरक्षा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत शिराळा तालुका प्रवासी संघाचे समन्वयक लालासाहेब शिंदे, बंटी नांगरे- पाटील, महादेव रोकडे, मानसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, महेश माने, मारुती रोकडे, कैलास देसाई यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.