ताज्या घडामोडी

दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार पकडा असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

मुरुम, ता. २० (प्रतिनिधी) : दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार पकडा, धर्मांध संघटनेवर बंदी आणा आणि खटला जलदगतीने चालवा. अंनिसच्या शिष्टमंडळाचे उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तींकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आज ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेचा निषेध करून केंद्र सरकार व राज्य सरकारला उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शनिवारी (ता.२०) रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत निवेदन दिले गेले. या निवेदनात म्हटले आहे की,
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला विरोध करण्यासाठी, प्रतिगामी विचारांच्या संघटित मारेकऱ्यांकडून त्यांचा खून करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पश्चात देखील त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य जोमाने पुढे सुरू ठेवले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचे देखील खून केले गेले. या चारही खुनांतील आरोपींचा परस्परसंबंध देखील तपासातून पुढे येत आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. या चारही खुनांबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना, खदखद आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आपल्याद्वारे केंद्र व राज्य सरकारकडे खालील मागण्या करीत आहोत, त्या आपण त्वरित सरकारकडे पोहोचवाव्यात. या वेळी अंनिसच्या शिष्टमंडळाने शासनाकडे प्रमुख तीन मागण्या केल्या. त्या अशा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा. या खुनामागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी. सदर निवेदन उमरगा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी स्विकारले. आपल्या मागण्या शासनापर्यंत नक्की पोहचवू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निवेदन देताना यावेळी मअंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रा. अवंती सगर, मुरूम शाखेचे कार्यकर्ते प्रा. गोपाळ कुलकर्णी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी अजिंक्य कांबळे, योगेश पांचाळ आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. फोटो ओळ : उमरगा, ता. उमरगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना निवेदन देताना प्रा. किरण सगर, डॉ. महेश मोटे, प्रा. अवंती सगर, प्रा. गोपाळ कुलकर्णी, अजिंक्य कांबळे, योगेश पांचाळ आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!