ताज्या घडामोडी

माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात सहभागी होणे आवश्यक ! – सागर पाटील * जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 14 पासून राज्यव्यापी बेमुदत संप

Spread the love

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी , निमसरकारी कर्मचारी , शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन ) यांच्या वतीने दि. 14 मार्च पासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सर्व घटकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केले. ते माटे – भोजणे सभागृह , देवरूख येथे आयोजित सभेला संबोधित करत होते. जुनी पेन्शन योजना हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा हक्क आहे. आज पर्यंत सत्तेत असलेल्या प्रत्येकाने केवळ आश्वासन दिले आहे. राज्यकर्त्यांना पेन्शन दिल्याने राज्याच्या तिजोरीवर भार पडत नाही पण कर्मचाऱ्यांना दिल्याने राज्य दिवाळखोरीत जाईल , हे गणित न समजणारे आहे. आपला सर्व उमेदिचा कालावधी शासन सेवेत घालवणाऱ्या कर्मचाऱ्याला उतारवयात निराधार बनविणाऱ्या शासन व्यवस्थेला सरकारी , निमसरकारी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी एकजुटीची ताकद दाखविण्याची योग्य वेळ आली आहे. आता सरसकट जुनी पेन्शन योजना मिळाल्याशिवाय थांबायचं नाही असे आवाहन त्यांनी सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांना केले. यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रदिप वाघोदे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब संघटना या संपात पूर्ण क्षमतेने उतरत असल्याचे जाहिर केले.
रत्नागिरी जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण गोरे यांनी आपल्या मनोगतातून चतुर्थ श्रेणी कर्मचारी देखील या संपात सहभागी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीष पाटील , सुशांत कविस्कर , गणपत शिर्के , कास्ट्राईब संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद पाटील , अध्यापक संघाचे सल्लागार आत्माराम मेस्त्री , रामचंद्र महाडिक , मुख्याध्यापक संघाचे दापोली अध्यक्ष संतोष हजारे , चिपळूण अध्यक्ष संजय चव्हाण , महिला प्रतिनिधी मुनव्वर तांबोळी , चतुर्थ श्रेणी संघटनेचे सचिव दिनेश वेताळे यांच्यासह तिन्ही संघटनांचे सर्व जिल्हा पदाधिकारी , तालुका अध्यक्ष , सचिव, सभासद व पतपेढीचे सर्व उमेदवार मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून संपाचे महत्व स्पष्ट करत सर्वांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेचे सुत्र संचलन अध्यापक संघाचे सचिव रोहित जाधव यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सुशांत कविस्कर यांनी मानले.
चौकट
सागर पाटील यांची समन्वय समितीच्या सचिवपदी निवड
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांची राज्य सरकारी , निमसरकारी कर्मचारी , शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी समन्वय समितीचे सचिवपद म्हणजे जिल्ह्यातील समस्त माध्यमिक शिक्षकांना मिळालेला सन्मान असून जिल्हयात प्रथमच माध्यमिक शिक्षकांना हे पद मिळाले असल्याचे रोहित जाधव यांनी स्पष्ट केले. या निवडी संदर्भात बोलताना रत्नागिरी जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र भोजे यांना पाटील यांनी धन्यवाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!