ताज्या घडामोडी

केंद्र सरकारने साखर निर्यातीस अनुदान दिले नाही,तर साखर उद्योगासमोर मोठे आर्थिक संकट उभा राहील- अध्यक्ष पी. आर.पाटील

Spread the love

इस्लामपूर दि.२७ प्रतिनिधी
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय करारास बाधा येईल ही सबब देत गेल्या वर्षांपासून साखर निर्यात अनुदान बंद केले आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी ६० लाख मेट्रीक टन साखर निर्यातीचा निर्णय घेवून प्रत्येक कारखान्यास ठराविक कोटा बंधनकारक केला आहे. हा मोठा विरोधाभास आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीस अनुदान दिले नाही,तर साखर उद्योगासमोर मोठे आर्थिक संकट उभा राहील,असे भाष्य राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील (दादा) यांनी केले.
साखराळे येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या ५२ व्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष एल. बी.माळी,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रा.शामराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.पाटील पुढे म्हणाले,केंद्र सरकार पूर्वी साखर निर्यातीस रुपये १०४४ अनुदान देत होते. ते पुढे रुपये ६०० व रुपये ४०० केले. गेल्या वर्षापासून ते बंद केले आहे. देशातील अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात अनुदान सुरू करायला हवे. सध्या साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल रुपये ३१०० आहे. तो किमान ३६०० करावा,अशी मागणी साखर संघ,राज्य सरकार सातत्याने करीत आहे. मात्र केंद्र शासनाने त्यास वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आपण ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखराळे युनिटची क्षमता प्रतिदिन ७ हजार मेट्रीक टन केली असून येथे आपण प्रतिदिन २८ मेगावॅट वीज निर्मिती करीत आहोत. यातील ५ कोटी ४८ लाख युनिट वीज वितरण कंपनीस विक्री करून आपणास ३७ कोटी ३५ लाख रुपये मिळाले आहेत. वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये प्रतिदिन १२ मेगावॅट वीज निर्मिती करतो. त्यातील १ कोटी ८५ लाख युनिट वीज वितरण कंपनीस विकून ८ कोटी ८७ लाख रुपये मिळले आहेत. आपण दररोज १ हजार मेट्रीक टन शिरफ अर्कशाळेकडे घेवून दररोज ७८हजार लिटर इथेनॉल निर्मिती करीत आहोत. पुढच्या हंगामात ही क्षमत १ लाख ५० हजार लिटल प्रतिदिन करीत आहोत. यावेळी त्यांनी जल सिंचन विभाग व ३९ कारखाना पुरस्कृत पाणी पुरवठा संस्थांचे कौतुक करून कोरो ना काळात केलेल्या कामांची,शेती विभागातील योजनांची माहितीही दिली.
यावेळी कार्यकारी संचालक आर.डी. माहुली यांनी सभेच्या नोटीस वाचन केले. तत्पूर्वी सचिव प्रताप पाटील यांनी दिवंगत मान्यवर,सभासद व कर्मचाऱ्यांचा श्रद्धांजली ठराव मांडला. सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचनही केले. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. प्रसिध्दी अधिकारी विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले.
सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,खरेदी समितीचे अध्यक्ष विराज शिंदे, शेती समितीचे अध्यक्ष श्रेणीक कबाडे, बांधकाम समितीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील,कार्तिक पाटील,दादासाहेब मोरे, जालिंदर कांबळे,प्रदीपकुमार पाटील,विठ्ठल पाटील,माणिक शेळके,सौ.मेघा पाटील, सौ.सुवर्णा पाटील,सौ.अलका माने,कामगार नेते शंकरराव भोसले,तानाजीराव खराडे, एस.डी.कोरडे,अमोल पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक,अधिकारी उपस्थित होते.

ना.जयंतराव पाटील यांचे
ऑन लाईन मार्गदर्शन।।
राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील हे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक,आधारस्तंभ आहेत. ते सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर भागातील संवाद दौऱ्यावरती आहेत. त्यांनी प्रवासात असताना ही सभेशी ऑन लाईन संपर्क ठेवत सभेतील चर्चा ऐकली. कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी ‘आपण मार्गदर्शन करावे’ अशी विनंती केल्यानंतर त्यांनी १०-१२ मिनिटे सभासदांना मार्गदर्शन केले.
ना.पाटील यावेळी म्हणाले,सध्या साखर निर्मिती व विक्रीस मर्यादा आहेत. त्यामुळे आपण इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढविण्या वर भर दिला आहे. आपल्या साखराळे युनिट मध्ये मे महिन्यानंतर पूर्ण क्षमतेने इथेनॉल निर्मिती होईल. पेट्रोल कंपन्याकडून इथेनॉलचे २१दिवसात पैसे मिळाल्याने लहान-लहान आर्थिक प्रश्न कमी होतील. आपण चारही युनिटमधून चांगले गाळप करीत आहोत. आतापर्यंत १९ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून पुढील १५-२० दिवसात २२ लाख मेट्रीक टनापर्यंत गाळप होईल. तिप्पेहळळी जत युनिटमध्येही लक्षणीय यश मिळत आहे. मध्यंतरी २-३ वर्षे आपण उसाच्या कमतरते मुळे हे युनिट बंद ठेवले होते. मात्र सध्या राज्य शासनाच्या जलसिंचन विभागमार्फत या भागात पाणी दिले जात असल्याने उसाचे प्रमाण नक्की वाढणार आहे. यावेळी त्यांनी कारखान्याची ऑन लाईन सभा खेळीमेळीत पार पाडल्याने सभासदांना धन्यवादही दिले.

 

फोटो ओळी- राजारामनगर येथे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या वार्षिक साधारण सभेत बोलताना कारखान्या चे अध्यक्ष पी. आर.पाटील. समवेत प्रा. शामराव पाटील, विजयराव पाटील,एल.बी. माळी,आर.डी.माहुली व मान्यवर. राजरामनगर येथे राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या वार्षिक साधारण सभेत सभासदांशी ऑन लाईन संवाद करताना ना.जयंतराव पाटील. समवेत कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, प्रा.शामराव पाटील,विजयराव पाटील,एल. बी.माळी,आर.डी.माहुली व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!