ताज्या घडामोडी

तिळ गुळ घ्या,गोड गोड बोला “

Spread the love

भारतामध्ये विविध प्रकारचे सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात.अशाच एका सणांपैकी एक म्हणजे मकर संक्रांती.मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
मकरसंक्रांत हा पौष महिन्यातील एक महत्वाचा सण आहे.दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते.यावर्षी १४ तारखेला मकर संक्रांत आलेली आहे.फार पूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता.तो लोकांना खूप त्रास देत असत व छळ करत असत.त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले.या संक्रांतीदेवीने संकारसूराला ठार केले आणि लोकांना सुखी केले.या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.आपली भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती आहे.त्यामुळे शेतकरीबांधवांमध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात.हरभरे,ऊस,बोरे,गव्हाची ओंबी,तीळ अशा गोष्टी सुगडात (बोळक्यात,खणामध्ये) भरून त्या देवाला अर्पण करतात.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यांमध्ये भोगी हा सण साजरा केला जातो.या दिवशी सर्व शेंगाभाज्या,फळभाज्या यांची तिळाचा कूट टाकून मिश्र भाजी केली जाते.त्यामध्ये पावटा,वाटाणा,वांग,बटाटा,गाजर,बोरे,पांढरे तीळ,हरभरा,वाल पापडी,घेवडा या सर्व भाज्यांचा समावेश असतो.तसेच तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी या दिवशी आवर्जून केली जाते.संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे.हा काळ थंडीचा असतो.त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी,लोणी,मुगाच्या डाळीची खिचडी,वांगी,सोलाणे,पावटा,गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा समावेश जेवणात करायचा असतो.तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ त्यामधील स्निग्धता.स्निग्धता म्हणजे स्नेह – मैत्री,या स्नेहाचे गुळासोबत मिश्रण करतात.स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातील मुख्य हेतू आहे.म्हणूनच या मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळ गूळ देऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात.तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या,गोड गोड बोला’असे एकमेकांना म्हटले जाते.
या सणाच्या निमित्ताने स्नेह वाढवायचा,नवीन स्नेहसंबंध जोडायचे,जुने असलेले समृद्ध करायचे,तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.संक्रांतीच्या दिवशी तिळाची वडी किंवा लाडू केले जातात आणि एकमेकांना दिले जातात.तसेच तीळ गुळाची पोळी यादिवशी आवर्जून केली जाते.संक्रांतीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच महिला भाविकांची गर्दीच गर्दी झालेली असते.दरवर्षी २१ – २२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे,त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले.पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१ – २२ डिसेंबरलाच होत राहिली,तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली.साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश होतो.सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१ – २२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते.
अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते.पृथ्वीवरून पाहिले असता,२१ – २२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.उत्तरायण’ शब्द,दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते.त्यांना इच्छामरणाचे वरदान होते.त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला.हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे.तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते.हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.लहान बालकांंनाही संंक्रांंती निमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे,हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.चुरमुरे,बोरे,हरभरे,उसाचे तुकडे,हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर घातले जाते.अलीकडे यामधे गोळ्या,छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते.तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात.याला बोरन्हाण असे म्हणतात.बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.रुक्मिणी मातेच्या मंदिरात महिला एकमेकींना वाण वसा मोठ्या श्रद्धेने देतात.हरभरे,ऊस,बोरे,गव्हाची ओंबी,तीळ अशा गोष्टी सुगडात (बोलकी,वाण) भरून देवाला अर्पण करतात.अशाप्रकारे हा संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात भारतात साजरा होतो.आजच्या दिवशी एकच संकल्प करु या….तिळ गुळ घ्या,गोड गोड बोला….!!! लेखक:-राजेंद्र दिक्षित
स.शि ( अमरावती )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!