ताज्या घडामोडी

भारतात पुन्हा हरित क्रांती घडून आली पाहिजे – प्रा. डॉ. जयवंतराव शंकरराव इंगळे

Spread the love

पुसेगांव दि. २७ भारतात सन १९६० नंतर हरितक्रांती घडून आली. १९६५ मध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. १९६६ नंतर विविध कृषी उत्पादनात मोठी वाढ झाली. संकरित बियाण्यांचा, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा शेतीत वापर वाढला. सिंचन सुविधेत वाढ घडून आली. कृषीविषयक संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचले. सरकारने पुढाकार घेऊन प्रचंड गुंतवणूक करून भारतात हरितक्रांती घडवून आणली. परंतु अलिकडच्या काळात शेती संकटात सापडली असून पाणी व रासायनिक द्रव्यांच्या अतिवापराने शेतजमिनी खराब होऊन शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत आहे. कृषी आदानांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने कृषी व्यवसाय बिनकिफायतशीर बनत चालला आहे. शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस •वाढत असून कर्जबाजारीपणा, दारिद्र्य इत्यादी कारणांमुळे शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. रोज शेतकरी आत्महत्या करत असून आत्तापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांच्यातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणापासून मुक्त करण्यासाठी, कृषी मालाची, विशेषत: अन्नधान्याची टंचाई व महागाई कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी शेतकरी कुटुंबांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी, कृषी उद्योगांना ( अन्नप्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग, भात गिरण्या, साखर कारखाने इ.) लागणारा कच्चा माल पुरेशा प्रमाणात व चांगल्या दर्जाचा मिळावा यासाठी, ग्रामीण भागातील शेतमजुरांना पुरेसा रोजगार आणि योग्य वेतन मिळावे यासाठी, ●देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवण्यासाठी भारतात पुन्हा एकदा हरितक्रांती घडून आली पाहिजे असे प्रतिपादन हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेजचे अर्थशास्त्र विभागप्रमुख आणि अर्थशास्त्राचे प्रोफेसर डॉ. जयवंतराव इंगळे यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या पुसेगाव यथील कला, वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलते प्रवाह’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. प्रारंभी मा. प्राचार्य डॉ. जगदाळे सर, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजीराव भोसले, प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांच्या हस्ते कर्मवीर अण्णा व सेवागिरी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. डॉ. इंगळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, अलीकडील काही दशकापासून भारतातील कृषी क्षेत्रावर मोठे आरिष्ट कोसळले असून त्याचा जास्त फटका लहान शेतकरी व शेतमजूर यांना बसला आहे. सीमांत शेतकरी, लहान व मध्यम शेतकरी यांची जगण्याची उमेद कमी होत आहे. कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी सरकारने कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली पाहिजे. खराब जमिनीची सुधारणा करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. सिंचन सुविधेत वाढ घडवून आणली पाहिजे. कृषी क्षेत्राला वीज आणि पाणी सवलतीच्या दराने दिले पाहिजे. सरकारने पुढाकार घेऊन पुन्हा एकदा लवकर हरितक्रांती घडवून आणली पाहिजे. कृषी उत्पादनात मोठी वाढ घडवून आणली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांमधील दारिद्र्य, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, आत्महत्या यांचे प्रमाण कमी होईल. शेती किफायतशीर होण्यासाठी सरकारने हरितक्रांती घडवून आणली म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकून दुसऱ्याच्या शेतात मजूर म्हणून राबण्याची पाळी येणार नाही. १९५१ साली शेतकऱ्यांचे प्रमाण ७२ टक्के होते ते आज ४४ टक्क्यावर आले असून शेतमजूरांचे प्रमाण २८ टक्क्यावरुन ५५ टक्क्यावर गेले आहे. कृषी क्षेत्रावरील आरिष्ट्ये दूर केली नाहीत तर देशात अराजक माजेल. म्हणून सरकारने शेतीच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांनी केले.

सुरवातीला प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांच्या हस्ते प्रा. डॉ. जयवंतराव इंगळे यांचा बुके आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जगदाळे यांनी कृषी क्षेत्राच्या विकासाची गरज स्पष्ट केली. या कार्यशाळेत प्रास्ताविक डॉ. एस. आर. शिंदे यांनी केले आणि आभार प्रा.एल. के. पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व प्राध्यापक उपस्थित होते. आय. क्यू.ए.सी.चे को-ऑर्डिनेटर प्रा. डॉ.माळी सर, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. संजयराव क्षीरसागर, प्रा. डॉ. एस. एम. भोसले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!