क्रीडा व मनोरंजन

प्रशांत कारीआची अष्टपैलू कामगिरी

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्रशांत कारीआने स्पोर्टिंग क्लब कमिटी आयोजित मर्यादित षटकांच्या ६५ व्या शामराव ठोसर स्मृती क्रिकेट स्पर्धेत जॉली जिमखान्याला अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करुन दिला. उपांत्य फेरीच्या एकतर्फी लढतीत प्रशांतच्या खेळामुळे जॉली जिमखान्याच्या संघाने मॉर्डन क्रिकेट क्लबचा नऊ विकेट्सनी दणदणीत पराभव केला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मॉर्डन क्रिकेट क्लबला ४० षटकात आठ फलंदाजांच्या मोबदल्यात १८६ धावापर्यत मजल मारता आली. समीत धवानीने ४८ धावांची महत्वपुर्ण खेळी केली. तर आदर्श उपाध्यायने नाबाद ३९ धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. प्रतिस्पर्ध्यांना द्विशतकी धावसंख्येच्या आत रोखताना प्रशांतने आठ षटकात तीन निर्धाव षटकासह २८ धावांत चार विकेट्स मिळवल्या. अभय पाटीलने दोन फलंदाज बाद केले.
उत्तरादाखल प्रशांतने ९१ चेंडूत १३ चौकार मारत ९७ धावांची खेळी करत संघाच्या मोठया विजयाचा पाया रचला. शुभम पुण्यार्थीने नऊ चौकार आणि एका षटकारासह ८४ चेंडूत नाबाद ७० धावांच्या खेळीने विजयाचा कळस चढवला. या डावातील एकमेव विकेट अमर कारटेने मिळवली. अंतिम फेरीत जॉली जिमखान्याला माझगाव क्रिकेट क्लबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
माझगाव क्रिकेट क्लबने भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा १३१ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. माझगाव क्रिकेट क्लबने १९८ धावांचे आव्हान भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाला दिले. सिद्धेश गवांदेने ६४ धावा केल्या. ऋषीकेश पवारने ३५ आणि तुषार चाटेने २४ धावांची खेळी केली. आकाश वरघडेने ४५ धावांत ३ फलंदाज बाद केले. काशीफ कामरान आणि मोनिष भोईरने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. या आव्हानाचा पाठलाग भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन संघाला सीमांत दुबे आणि हृषिकेश पवारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ६७ धावांवर गुंडाळले. सीमांतने सात षटकात दोन निर्धाव षटके टाकत आठ धावांमध्ये चार विकेट्स मिळवल्या. हृषिकेशने ७.५ षटकात एका निर्धाव षटकासह सहा धावा देत चार फलंदाज बाद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!