ताज्या घडामोडी

मौन

Spread the love

“मौन”…!!! खरच शब्दात च इतकं सामर्थ्य आहे, कि या विषयावर काही बोलणं किंवा लिहिणं म्हणजे त्या शब्दाचा उपमर्द केल्यासारखे च होईल..!! पण काय करावे..!? विषय च असा आहे की मनातले विचार कागदावर उतरवल्याशिवाय रहावतच नाही..! म्हणून हा छोटासा लेखन प्रपंच करून पहावा म्हटलं..!
“मौनं सर्वार्थ साधनं !” असं जे म्हटलं आहे ते उगीच नाही. जे विषय अगदी भांडून म्हणा किंवा वेळप्रसंगी प्रत्यक्ष हाणामारी ने सुद्धा सुटत नाहीत, ते फक्त आणि फक्त या “मौना” मुळे च सुटतात. पण “मौन” राहणे म्हणजे खरेच नेमके काय ? तर फक्त कुणाशीही न बोलणे म्हणजे “मौन” होय का ? तर नक्कीच नाही. हं न बोलण्याची क्रिया ही मौनात येते पण नुसतं च कुणाशीही न बोलणे म्हणजे सर्वार्थाने मौन असू शकत नाही. तर काया, वाचा आणि मनाने हे “मौन” साधले पाहिजे , तर ते खरे “मौन” म्हणता येईल. काया , वाचा आणि मन या तिन्ही स्तरावर ते साधले पाहिजे. विषयांचे अतिसेवन टाळणे म्हणजे एक प्रकारे त्या त्या इंद्रियांचे “मौन” च होय. पंच ज्ञानेंद्रिये (डोळे,कान, नाक,जीभ, आणि त्वचा) आणि पंच कर्मेंद्रिये【 हस्त, पाद, वाणी,पायु-(गुद), उपस्थ-(जननेंद्रिय), 】यांच्या विषयांचे अतिसेवन न करणे म्हणजे एक प्रकारे “कायिक मौन” च म्हणता येईल. तसेच मनाने सतत भगवंताचे नामस्मरण करणे, दुसऱ्याबद्दल कधीही वाईट न चिंतणे, मनाच्या काम, क्रोध, लोभ , मोह , मद, मत्सर या विकारांवर विजय मिळवणे म्हणजे हे एक प्रकारे “मानसिक मौन किंवा मानस मौन ” च होय असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आणि तिसरे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे ते म्हणजे “वाचिक मौन” कारण मुळात मौन राहणे म्हणजे च वाचा न वापरणे किंवा वाणी चा उपयोग न करणे किंवा अगदी कामपूरता पण योग्य तो व योग्य त्याच ठिकाणी करणे असे होईल. म्हणून च या पंच ज्ञानेंद्रियातील सर्वात विखारी आणि जिव्हारी लागणारे जर कोणते इंद्रिय असेल तर ते म्हणजे “जीभ,रसना, वाणी, वाचा…!” नावं अनेक असली तरी हे एकमेव असे इंद्रिय आहे की जे पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये या दोन्ही प्रकारात येते. कारण पंच ज्ञानेंद्रियानुसार षड्रस अन्नाची जशी चव कळते तसेच पंच कर्मेंद्रियानुसार “वाणीच्या” कार्याने म्हणजेच बोलण्याने कधी सुख , आनन्द उपभोगता येतो तर कधी दुःख , दैन्य , तर कधी शापित जीवनही भोगावे लागते. इतके सामर्थ्य या एका इंद्रियात म्हणजेच या वाणीत आहे. आणि याचे दाखले तर आपल्याला अगदी पुराण काळापासून मिळतात.पुराण काळातील व्यक्ती पण इतक्या सामर्थ्यशाली, प्रतिभासंपन्न आणि आध्यात्मिक स्तरावर अति उच्च अवस्थेत असल्याने त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सामर्थ्यशाली असायचा. त्यामुळेच त्यांनी दिलेले “शाप” आणि “वरदान” याचे फळ एखाद्या व्यक्तीला मिळत असे. पण आज या कलियुगातील व्यक्ती सामर्थ्य संपन्न म्हणा किंवा अध्यात्मिक स्तरावर उच्च अवस्थेत नाहीत. त्यामुळे शाप आणि वरदान यांचे महत्त्व च उरले नाही. पण यालाही काही अपवाद आहेतच. या कलियुगात देखील अनेक संत महात्मे होऊन गेले आणि अजूनही असे अनेक संत , महात्मे, आहेत जे अतिशय प्रतिभासंपन्न आणि अध्यात्मिक स्तरावर ही उच्च अवस्थेत आहेत, त्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेले वाक्य हे “शास्त्र प्रमाण” वाक्य असते. पण तरीही या युगात एखादया चे वाईट चिंतणाऱ्या व्यक्तीने जर त्या व्यक्तीबद्दल काही अपशब्द काढले किंवा बोलले तर आजही “जीभ काळी असणे, तळतळाट लागणे, जिभेला हाडच नसणे” इत्यादी म्हणी या “वाणी च्या” सामर्थ्याच्या जोरावरच अस्तित्वात आल्या आहेत यात शंकाच नाही. आणि म्हणून च या “जिभेवर” दोन्ही प्रकारे म्हणजे अगदी खाण्यापासून ते बोलण्यापर्यंत ताबा मिळवणे हे सोपे काम नाही. म्हणूनच या जिभेला दोन्ही प्रकारे नियंत्रित ठेवण्यासाठी “मौन” सर्वात महत्त्वाचे साधन होय.कायिक आणि वाचिक या दोन्ही प्रकारे जिभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी “मौन”सारखा सर्वात सोपा पण करायला तेवढाच कठीण असा हा उपाय सापडणे अशक्य होय…!!
होय..! “कठीण” च म्हणावे लागेल..!! कारण म्हणायला “मौन” जेवढे सोपे वाटते तेवढे आचरायला ते कठीण आहे. कारण आचरण करणे इतके सोपे नाही. कारण डोळे, नाक, कान आणि त्वचा या इतर इंद्रियांच्या विषयांची प्रलोभने म्हणा किंवा त्या इंद्रियांच्या विषयांचे सेवन हे वाणीने बोलल्याशिवाय, त्याची प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. त्या त्या विषयांचे ज्ञान हे शब्द सामर्थ्याने प्रकट करण्यासाठी मन सतत कार्यरत असते. त्यामुळे चांगले , वाईट अनुभव हे शब्दाने सांगण्यासाठी किंवा शब्दाद्वारे प्रकट करण्यासाठी मन सतत वाणीला उद्युक्त करत असते. आणि मनातील भावना शेवटी या वाणीद्वारे च प्रकट होत असतात.
या वाणीचे देखील चार प्रकार सांगितले आहेत. “१)परा, २)पश्यनती, ३)मध्यमा , ४) वैखरी, हे ते चार प्रकार होत. परेपासून वैखरी पर्यंत उत्तरोत्तर हे प्रकार स्थूल होत जातात. मुखातून बाहेर पडलेले वाक्य जे कानांद्वारे ऐकले जाते – अशी वाणी म्हणजे “वैखरी वाणी” होय. एखादे वेळी वाक्य हे बाहेर अजिबात ऐकू येत नाही. आतच केवळ ओठांच्या हालचाली वरून आपणास अर्थबोध होतो, ती वाणी म्हणजे “मध्यमा वाणी” होय.कंठाच्या आतील वाणी जी गळ्यापर्यंत येते पण तिथून बाहेर येऊ शकत नाही , अशी वाणी जी मनातच घोळते तिला “पश्यनती वाणी ” म्हणतात. सर्वात स्थूल वाणी ही “वैखरी”! त्यानंतर थोडी सूक्ष्म ती “मध्यमा”! मध्यमेहुन सुक्ष्मतर वाणी म्हणजे “पश्यनती”, आणि या पश्यनती हुनही अतिसूक्ष्म तम असणारी वाणी म्हणजे “परा” वाणी होय.ही वाणी नाभीत निर्विकल्प पणे राहून संकल्प मात्र असणारी अशी वाणी होय…!!!
तर अशी ही सामर्थ्यसंपन्न असणारी “रसना” जी रसनेचे आणि वाणीचे दोन्ही प्रकारचे काम करते , तिला जिंकणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे. कारण एकट्या रसनेला जिंकलं कि सर्व जिंकलं , असे उगीच म्हटले नाही. म्हणून च या “दुधारी तलवारी ला” जिंकलं तरच “मौन साधलं किंवा मौन पाळलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणून च अध्यात्मात म्हणा किंवा सामान्य माणसाने त्याच्या नित्य जीवनात ही उन्नती करावयाची असेल तर काया, वाचा आणि मनाने हे मौन पाळले पाहिजे. विषयांचे अतिसेवन टाळले पाहिजे . तरच त्याची पुढे योग्य मार्गावर उत्तरोत्तर प्रगतीची वाटचाल ही चालू राहते. कारण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे, ज्याला हे वाणीचे सामर्थ्य लाभले आहे. त्यामुळे त्या वाणीचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग करणे हे सर्वार्थाने मनुष्याच्या च हाती आहे. मनुष्याची 90 टक्के प्रगती ही त्याच्या वाणीच्या सामर्थ्यावर होत असते, असे मला वाटते. कारण वाणी च्या सहाय्याने शत्रुलाही आपलंसं करता येते तर तिच्याच जोरावर जगही जिंकता येते. म्हणून च तिचा वापर आत्मिक उन्नती साठी कसा करावा , हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आणि यासाठी च “मौनं सर्वार्था साधनं…!!!” म्हटले आहे ते उगीच नाही…!!!!

राजेद्र दिक्षित (स शि)
जि.प उच्च प्राथ.शाळा कठोरा (बु) पं सं.- अमरावती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!