ताज्या घडामोडी

भारतरत्न लता मंगेशकर..

Spread the love

पाहता पाहता आज सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जाऊन एक वर्ष झाले.लता मंगेशकर हे नाव माहित नाही असा माणूस या जगात शोधूनही सापडणार नाही.”आनेवाला आयेगा”म्हणत स्वर्गीय सुरांची सुरु झालेली ही बरसात अखंड राहणार आहे.आकाशात चंद्रसूर्य आणि पृथ्वीच्या आसमंतात लतादीदींचे स्वर हे अविनाशी आहेत.यास आदि नाही,अंत नाही.तो श्रीगणेशाचा ओंकार आहे.तो देवी सरस्वतीचा हुंकार आहे.तो गंगेचा प्रवाह आहे.तो ज्ञानेशाच्या अमृतमय शब्दांचा स्वर आहे.या स्वराने अनेकांना रडायला लावले.या आवाजाने कित्तेकाना आनंदात चिंब भिजविले.या स्वराने ज्ञानराजमाऊलींच्या आळंदीला भक्तरसात बुडविले.या स्वराने तुकोबांच्या अभंगाला न्हाऊ घातले.या स्वराने नामयाच्या लडिवाळ शब्दांना कवेत घेतले.याच स्वराने बॕ.तात्याराव सावरकरांच्या सागराला ने मजसी ने परत मातृभूमीला असे गात सागराला ऊचंबळून टाकले. याच आवाजाने प्रेमभंग झालेल्या अनेक जीवांना तारले.याच स्वराने निराश मनाला फुललेल्या मोगऱ्याचा सुगंध दिला.या स्वराने थकलेल्या जीवांना भल्या पहाटे “ऊठी ऊठी गोपाळा”म्हणत आपल्या गोड आवात जागे केले.अशी सत्तर वर्षे अखंड भरतखंडातील प्रत्येक माणूस लतादीदीचे गीत ऐकत ऐकतच झोपी जातो व ऐकत ऐकतच जागा होतो.
मास्टर दीनानाथ व शेवंती तथा माई यांची ही जेष्ठ कन्या.मध्यप्रदेशातील इंदूर येथे २८ सप्टेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म झाला.आशा,ऊषा,मीना आणि धाकटा हृदयनाथ ही त्यांची भावंडे.एकाच कुटुंबात एवढी दिव्य भावंडे जन्माला यावीत हाच मोठा चमत्कार आहे.मास्टर दिनानाथ मंगेशकर हे महान गायक होते.रंगकर्मी होते.१९४२ साली ते वयाच्या ४२व्या वर्षी अकाली गेले.ही भावंडे पोरकी झाली.लतादीदी फक्त तेरा वर्षाच्या होत्या.दीनानाथांची बलवंत नाट्य कंपनी कर्जात बुडाली.सांगलीच्या गणपती मंदिराजवळ हे कुटुंब राहत होते.लतादीदींचे बालपण सांगलीत गेले.डोक्यावरचे पितृछत्र गेले,आणि कर्ज आले.सांगली त्यांना सोडावी लागली.लहान वयात झालेला आघात त्या कधी विसल्या नाहीत.दीदी सोडून सर्व भावंडे कधीना कधी सांगलीत आले.परंतु दीदी कधीच पुन्हा आल्या नाहीत.
कुटुबांची सर्व जबाबदारी लहान वयातच त्यांच्यावर आली.मास्टर विनायक हे मा.दीनानाथांचे जिवलग मित्र होते.त्यांनी लता मंगेशकराना मदत केली.कोल्हापूराच्या पॕलेस थियटर जवळ एका लहानशा घरात दीदी आपल्या आई व भावंडाना घेऊन राहिल्या.मा.विनायकांनी त्यांना चित्रपटात काम दिले.लहान मोठ्या भूमिका केल्या.वडिलांचा संगीताचा आणि गायनांचा वारसा होताच.वयाच्या नवव्या वर्षापासून शास्त्रीय संगीत त्या शिकत होत्या.वडिलांच्यानंतर,बडे गुलामअली खान,ऊस्ताद अमानत खान,पंडीत तुलसीदास शर्मा यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.
१९४९ साली “आनेवाला आयेगा”म्हणत सुरु झालेला हा सूरांचा प्रवास कधी थकला नाही.कधी भागला नाही,कधी वृद्ध झाला नाही.समुद्राचे पाणी कधी आटते का ? चंद्राचा प्रकाश कधी म्लान होतो का? सूर्य कधी निस्तेज होतो का?लतादीदीचे स्वरही तसेच आहेत लतादीदीचे गायलेले कोणतेही गाणे असो ते थेट हृदयाला जाऊन भिडते.त्या आवाजाला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे.होनाजी बाळाची भूपाळी असो,ज्ञानेश्वरांच्या विराण्या असोत,तुकोबांचे अभंग असोत,गदीमांची गीते असोत.किंवा हिंदी चित्रपट गीते असोत,त्यांनी गायलेले प्रत्येक गीत म्हणजे वेलीवर बहरलेली फुलेच आहेत.ठुमरी,भजन,भावगीत,नाट्यगीत,चित्रपट गीते अशी विविध प्रकारची गीते गायलेली लतादीदी एकमेव गायिका आहेत.आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडता साठ वर्षे सतत सुरांची ऊधळण करणाऱ्या दीदी एक अलौकिक गायिका आहेत.राष्ट्रगीतातील पंजाब -सिंधु -गुजरात -मराठा-द्राविड-ऊत्कल-बंग असा सारा अवघा भारत आपल्या दैवी सूरांनी लतादीदीनी बांधून ठेवला आहे.तीन साडे तीन मिनिटांची हिंदी चित्रपट गीते लतादीदीनी अशी काही गायली आहेत कि त्यांची नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु वेलीवरचे बहरलेले फुल व कागदाचे फुल यामध्ये जसा फरक असतो तसाच या अस्सल व नक्कल मध्ये आहे.हजारो गाणी त्यांनी गायली आहेत.त्यामधील आवडीचे निवडणे अशक्यच! लग जा गले,अजिब दास्तान है ये,नैना बरसे,आपकी नजरोने समझा,ये दिल और ऊनकी,मोगरा फुलला अशी सदाबहार गाणी मनात आनंदांचे कल्लोळ निर्माण करतात.त्यांच्या आवाजातील लयकारी मन मोहून टाकते.फुलपाखरांने या फुलावरुन त्या फुलावर झेप घ्यावी तितक्या सहजतेने दीदीची लयकारी अंचबीत करुन टाकते.प्रेमातला विरह असो की अभंगातला भक्तिरस असो ऐकणारा समाधित जातो.लतादीदींची गाणी कधी डोळ्यातून अश्रू,कधी मनात प्रेमरसांच्या धारा,तर कधी अंगावर रोमांच ऊभे करतात.त्यांना सरस्वतीचे रुप मानतात.परंतु जर सरस्वती असेल तर ती लतादीदीसारखीच असेल एवढे मात्र खरे आहे.
संसारतापाने दुःखी झालेल्या प्रत्येक माणसांना दीदीच्या स्वराने जगण्याचे बळ दिले आहे.अलेक्झांडरने सारे जग जिंकले होते कि नाही हे माहीत नाही.परंतु लतादीदीच्या सुरांने मात्र सारे विश्व जिंकले आहे.दीदींच्या या सुरांच्या साम्राज्यात सारे जण सुखी आहेत.या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही.तुम्ही कोठेही असा दीदीचे स्वर सोबत करतात.घरी स्वयंपाक करणाऱ्या अन्नपूर्णेपासून ते देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकापर्यंत दीदीच्या स्वरांचे राज्य आहे.
निराश झालेल्या,जीवनात नैराशाने होरपळलेल्या,जीव नकोसा झालेल्या प्रत्येक मनुष्यास लतादीदीचे स्वर कानावर पडताच “आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहीकडे” असा साक्षात्कार होतो.आणि हे जीवन सुंदर आहे वाटू लागते.
आज लतादीदीना जाऊन आज वर्ष झाले आहे.त्या आपल्यात नाहीत.हे मानायला मन तयार होत नाही.दीदीचे स्वर आणि मनुष्य यांचे अद्वैताचे नाते आहे.लौकिक अर्थाने दीदी आपल्यात नाहीत.परंतु त्यांचे अलौकिक स्वर आपल्या अवती,भोवती,वरती,खाली,जिकडे,तिकडे,सर्वत्र गुणगुणतील राहतील नाम गुम जाएगा,चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पहेचान है.
या अलौकिक भारतरत्नाला त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी श्रध्येय प्रणाम.
प्राचार्य बी एस जाधव
बांबवडे ता पलूस जि सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!