ताज्या घडामोडी

अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या यादीत मुरूम महसूल मंडळाचे नाव समाविष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २१ (प्रतिनिधी) :
मुरुम मंडळातील सर्वच गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून अतिवृष्टी होऊन देखील मंडळाला अतिवृष्टी अनुदान यादीतून वगळण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी (ता. १८) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करून अतिवृष्टी अनुदान यादीत समावेश करण्याची मागणी केली. जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले असून त्यात शंखी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याऐवजी नुकसान भरपाईग्रस्त यादीमधुन मुरूम महसूल मंडळ वगळले आहे. शहरात बसविण्यात आलेले पावसाची नोंद घेणारे पर्जन्य मापकयंत्र योग्य ठिकाणी नसून त्या भागात महसूल मंडळाच्या अंतर्गत येणारी शेतजमीन कमी प्रमाणात आहे, असे यावेळी शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. शहराच्या पश्चिम, दक्षिण व इतर भागात महसूल मंडळाच्या अंतर्गत येणारी शेतजमीन मोठ्या प्रमाणात असून या भागात तब्बल १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडून अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे पंचनामे मंडळात त्याच कालावधीत शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी लोकप्रतिनिधीसह महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे व अतिवृष्टीपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शासनाकडे पाठवले आहेत. तरी देखील मुरूम मंडळाला आर्थिक मदत यादीतून वगळल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. म्हणून आपण महसुल व कृषी अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरत या महसुल मंडळाचा अतिवृष्टी नुकसानग्रस्त मंडळात सहभाग करुन याभागातील शेतकऱ्याला सरसकट आर्थिक मदत देऊन न्याय द्यावे. अशी मागणी आंदोलनात करण्यात आली. आंदोलनाला महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत प्रशासनातर्फे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जाधव, दत्तात्रय इंगळे, नगरसेवक अजित चौधरी, बाबा कुरेशी, लखन भोंडवे, भगत माळी, युसूफ मासुलदार, विजय शेळके, बसवराज भोसगे, विजयकुमार घोडके आदींनी पुढाकार घेऊन निवेदन दिले.
आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शिवाजी चौकात मुरुम महसुल मंडळाचा अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मंडळात समाविष्ट करण्यासाठी चक्काजाम आंदोलन प्रसंगी पदाधिकारीसह आंदोलनकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!