ताज्या घडामोडी

ज्या घरातील मुलांचा मेंदू श्रीमंत ते घर श्रीमंत _कृषी शास्त्रज्ञ मा. डॉ. शिवाजीराव ठोंबरे

Spread the love

घराला श्रीमंत बनवायचं असेल तर मुलांना चांगल्या शिक्षणासोबतच चांगले संस्कार द्या असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. शिवाजीराव ठोंबरे यांनी *धनगर प्राध्यापक महासंघ* आयोजित समाज जागृती उपक्रमांतर्गत *लेखकांच्या दृष्टिकोणातून धनगर समाज* या विषयावर बोलतांना केले. त्यांनी *डोंगरपल्याड* या कादंबरीचा प्रसंग सांगतांना _”मी डोंगरपल्याड लिहू शकलो कारण मी डोंगरापल्याड जगलो आहे”_ असं ते म्हणाले. समाज बांधवांना मार्गदर्शन करीत असतांना त्यांनी धनगर समाजावर लिहिल्या गेलेल्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला. धनगर समाजाने वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन केले पाहिजे; असेही प्रतिपादन त्यांनी या व्याख्यानाच्या निमित्ताने केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कृषिराजयोगिनी होत्या, असे त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कृषिविषयक कार्याचा आढावा घेतांना सांगितले. *यावेळी त्यांनी अहिल्यादेवी यांनी सुरू केलेल्या ७/१२ प्रथेचा इतिहास सांगितला. शेताच्या बांधावर शेतकऱ्याने ७ झाडं लावली तर अहिल्यादेवींनी त्याला होळकर सरकारतर्फे १२ फळझाडे देऊन ७/१२ ची उज्वल परंपरा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अहिल्यादेवींच्या कुशल जलव्यवस्थापनेवरही त्यांनी अनेक संदर्भ देत प्रकाश टाकला.* डॉ. शिवाजीराव ठोंबरे यांनी अनेक विषयांवर यावेळी चर्चा केली. धनगरी साहित्याचा आढावा घेतांना त्यांनी गजनृत्य, ओव्या, धनगरी म्हणी, इ. गोष्टींचा विशेष असा उल्लेख केला. याप्रसंगी त्यांनी स्वरचित अनेक कविता सादर केल्या.
बदलत्या आधुनिक काळात धनगर समाजातील युवकांनी शास्त्रीय दृष्टिकोण स्वीकारून आधुनिक पद्धतीने पूर्ण बंदिस्त शेळीपालन करावे, असा सल्ला त्यांनी धनगर समाजातील नवोदित उद्योजकांना दिला. धनगर समाजाला प्रगतीपथावर पुढे जायचे असल्यास आपल्या बौद्धिक क्षमतेचा पूर्ण विकास करायला हवा, असेही मत त्यांनी या निमित्ताने समाज बांधवांसमोर व्यक्त केले. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे धनगर बांधवांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकत धनगर प्राध्यापक महासंघाच्या धुळे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. डॉ.कल्पना घोलप यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय धनगर प्राध्यापक महासंघाच्या सदस्या प्रा. सुचित्रा रत्नपारखी यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट, हडपसर, पुणे येथील प्रा. डॉ.अनिता खटके यांनी भूषवले तर आभार धनगर प्राध्यापक महासंघाच्या सदस्या प्राचार्य अर्चना नागे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर प्राध्यापक महासंघाच्या पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रत्नमाला वाघमोडे यांनी केले.

या उपक्रमाचे संपूर्णपणे रेकॉर्डिंग केले जात असून लवकरच ही व्याख्याने, चर्चासत्र, इ. युट्युबवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. समाज प्रबोधनातून समाजपरिवर्तनाच्या उद्दिष्टाने प्रेरित होऊन आयोजित केल्या गेलेल्या या उपक्रमाला समाजातील सर्व मान्यवरांनी प्रतिसाद द्यावा, तसेच समाजातील तळागाळातील धनगर बांधवांपर्यंत ही विचारसरणी पोहचवावी, असे आवाहन धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ, उपाध्यक्षा तथा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. संगीता चित्रकोटी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानदेव काळे, सचिव प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी तसेच धनगर प्राध्यापक महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. दर गुरुवारी होणाऱ्या व प्रबोधनपर व्याख्यान मालेचा लाभ आपण गुगल मीटच्या खालील लिंक वर घेऊ शकता: https://meet.google.com/vnp-bdgf-ism

प्रा. डॉ. अतुल संतोष सुर्यवंशी
सचिव
धनगर प्राध्यापक महासंघ (महाराष्ट्र राज्य)
मो. 9823197358

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!