ताज्या घडामोडी

अवयवदान विषयी नाटक व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती

Spread the love

वार्ताहर :
समाजामध्ये अवयवदानाविषयी जनजागृती होणे काळाची गरज आहे. कांही देशात मृत्यू पश्चात संबंधित मृतदेह, तेथील सरकारच्या ताब्यात दिला जातो. त्यामुळे त्या देशात वैद्यकीय सोयी सुविधामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाद्वारे अधिकाधिक प्रगती होत आहे.
एका मृतदेहाच्या माध्यमातून आठ रूग्णांच्या आयुष्यात आनंद फुलविता येतो. आपल्याकडे ज्यावेळी आपल्या जवळच्या आप्तेष्टांचा अवयवाअभावी मृत्यू होतो, त्यावेळीच आपल्याला अवयवदानाचे महत्त्व समजते. नैसर्गिक मृत्यूनंतर त्वचा, हाडे, रक्तवाहिन्या, कानाची हाडे यांचे प्रत्यारोपण करता येते. मात्र ब्रेनडेड झाल्यावर या अवयवाशिवाय डोळे, किडनी, मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, आतडे, हृदय, स्वादुपिंड, स्वरयंत्र यांचे प्रत्यारोपण करणे आधुनिक तंत्राने शक्य झाले आहे. तर जिवंत दात्याच्या शरीरातुन रक्त, अस्थिमज्जा, एक किडनी, यकृत, फुप्फुसे, आतडे, स्वादुपिंडाचा काही भाग प्रत्यारोपण करता येतो. आज आपले अमूल्य अवयव, मृत्यूनंतर एक तर जमिनीत पुरतात अथवा भडाग्नी देऊन नामशेष केले जातात. सर्वांना अवयवदान करणे शक्य असूनही, फक्त आणि फक्त गैरसमज व अंधश्रद्धेपोटी अवयवदान करण्यास समाज पुढे येत नाही. त्यामुळे सध्या भारत देशात दर दोन मिनिटाला अवयवाअभावी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे व हि प्रक्रिया निरंतर सुरु आहे.
या कारणास्तव समाजात जनजागृती व्हावी यासाठी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही चळवळ समाजातील सर्वच घटकापर्यंत पोहोचावी यासाठी, यशोदर्शन फाउंडेशन व ॲस्टर आधार व्हॉलेंटीयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ जून ते २२ जून या कालावधीत शहरातील गजबजलेल्या भागात तसेच अनेक गावात पथनाट्याच्या माध्यमातून, अवयवदानाविषयी जनजागृती करण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती.
या पथनाट्यामध्ये १३ सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्याचबरोबर दिनांक २२ जून रोजी केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे, जिराफ थिएटर मुंबई यांचेवतीने “स्टार” या अवयवदानावर आधारित नाटकाचा प्रयोग यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. यावेळी जवळपास ७५० हून अधिक जणांनी या नाटकाचा प्रत्यक्ष लाभ घेतला. या प्रभावशाली नाटकाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास ॲस्टर आधार हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. उल्हास दामले, डॉ. केणी, डॉ. साळे, त्यांचे सहकारी व स्टाफ तसेच यशोदर्शन फाउंडेशनच्या वतीने योगेश अग्रवाल, सुरेश केसरकर, भगवान माने, संजय सासणे, प्रताप घेवडे तसेच अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अवयवदान चळवळीस व्यापक दिशा देण्यासाठी सुरेश केसरकर यांना विस्तार अधिकारी म्हणून, योगेश अग्रवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून अवयवदान विषयीचा संदेश विविध मिडियाच्या माध्यमातून जवळपास २५००० पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालेचे, आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सुरेश केसरकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!