ताज्या घडामोडी

३१ डिसेंबर…

Spread the love

पाहता पाहता आणखी एक वर्ष निघून गेले.कालचक्र विलक्षण वेगाने धावत असते.ते थकत नाही,ते थांबत नाही, ते चिरंतन आहे,ते चिरतरुण आहे,ते नित्यनूतन आहे,ते अविनाशी आहे,ते चैतन्यदायी आहे.त्यास आदि नाही.अंत नाही.माणसाचे जीवन मात्र क्षणभुंगूर आहे.सरणारे प्रत्येक वर्ष आपणांस याची जाणीव करुन देत असते.आयुष्यातील एवढी वर्षे कशी सरत गेली ते कळत नाही.खरे पाहता माणसाचे आयुष्य कधी वाढत नसते.ते क्षणाने,दिवसाने,महिन्याने,वर्षाने कमी कमी होत असते.आणि आपण बिचारे पामर!आपले आयुष्य एका वर्षाने वाढले म्हणून वाढदिवस साजरा करतो.!
तो वाढदिवस नसतोच मुळी!तो असतो घटदिवस.घटदिवसच आपण वाढदिवस म्हणून साजरा करत असतो.
तरीही आयुष्यातील सरणारे प्रत्येक वर्ष हे महत्वाचे असते.कधी ते आनंदाचे असते तर कधी ते दुःखाचे असते. आपली एक भावमुद्रा मनावर ऊमटवून जात असते.बरेचजण सरत्या वर्षाला साक्षी ठेवून काही संकल्प करतात.काय करायचे आणि काय करायचे नाही याचा निश्चय करतात.कोणी चहा,कोणी मद्यपान,कोणी मांसाहार कायमचे वर्ज्य करुन नव्या वर्षाचे मोठ्या ऊत्साहात स्वागत करतात.पण ही शूरता टिकतेच असे नाही.पुन्हा तेच मागील पानावरुन पुढे चालूच राहते.सरत्या वर्षाचा निरोप घेत असताना गतसाली काही हरवलेले हळवे क्षण मात्र मन ऊदास करतात.आयुष्यातील अशी अनेक वर्षे सरत जातात नि आपल्या विस्मृतीतही जात असतात यामध्ये अपुर्वाई नाही पण काही क्षणाच्या काही वर्षाच्या पंखाना आपल्या गोड गहिऱ्या स्मृती कायमच्या बिलगलेल्या असतात.मनाच्या खोल डोहात त्या पहुडलेल्या असतात.काही केल्या त्या मनातून जात नाहीत.मग प्रत्येक सरणाऱ्या वर्षाच्या कातरवेळी या स्मृती आपल्या रंगीबेरंगी पंखानी मनाभोवती पिंगा घालू लागतात आणि मन सैरभैर होऊन जाते.कसलीतरी हूरहूर मन व्यापून टाकते.
तशी सर्वच माणसे दुःख लपवून जगत असतात.कोणी गेल्याचे दुःख असते.कोणी आपणापासून दुरावल्याचे दुःख असते.माणसे चेहऱ्यावर सुखाचा मुखवटा घालून जगत असतात.
बरेच जण आज सरत्या वर्षाचा लेखाजोखा मांडतील.एकांतात कडूगोड आठवणीची ऊजळणी करतील.एकांतात आपले दुःख,आपली वेदना आपणांस अधिक हळवे करतात.आपले काय चुकले?आपण कोणास दुखावले?आपण काय गमावले?याचा मनाशी हिशोब मांडतील.असा हिशोब माणसाला अंतर्मुख करतो.मनावरची दाटून आलेली अभ्रे दूर करतो.मन प्रसन्न करतो.
क्षण,मिनिटे,तास,दिवस,रात्र,वर्षे अशीच ऊलटत जातात.कालचक्र वेगाने धावत असते.मग आपण का बरे थांबायचे ?आपणही त्याबरोबर जायचे.ऊगीचच मागे कोठे रेंगाळायचे नाही.आणि बरे कोणासाठी रेंगाळायचे?
सगे सोयरे डोळे पुसतील | पुन्हा आपल्या कामी
लागतील |
ऊठतील बसतिल हसुनी खिदळतिल | मी जाता
त्यांचे काय जाय |
हे खरे नाही का?
माणसाचे आस्तित्व क्षणभुंगूर असते.काळाचे पुढे तो हतबल असतो.सारेच क्षणभुंगूर!पण लोभ मात्र चिरंतन असतो.तो संपता संपत नाही.माझे घर,माझी संपत्ती,माझी जमीन या स्वामित्वाच्या भावनेतून त्याची सुटका होत नाही.त्याला आणखी संपत्ती हवी असते,आणखी जमीन हवी असते.माणसाला किती जमीन लागते?रशियन लेखक Leo Tolstoy यांची How much land does man require? ही प्रसिध्द कथा आहे.Leo Tolstoy या कथेत म्हणतात,फक्त साडेतीन हात.शेवटी एवढीच त्याला पुरेशी आहे.परंतु आयुष्यभर मनुष्य किती आटापिटा करतो.किती धावाधाव करतो.शेवटी थकतो.आणि मग संपतो.तुकोबा म्हणतात,
“वितीयेवढेंसें पोट | केवढा बोभाट तयाचा” |
जळो याची विटंबना |जना भूक नाचवी |
हे खरे नाही का?
“शरिरसंपत्ति मृगजळभान |जाईल नासोन खरे नव्हे”|
हे माहित असूनही माणसाला शरिराचा,सौंदर्याचा,शक्तीचा अहंकार असतो.तो व्यर्थ असतो.”देह मृताचे भातुके” आहे.ते नश्वर आहे.जोपर्यंत शरिर धडधाकट आहे,जोपर्यंत संपत्ती जवळ आहे.जोपर्यंत आपले बरे आहे.तोपर्यंत आप्तजन,सगेसोयरे यांची गर्दी भोवती असते.पण हे सारे संपताच या “गर्दी” ची पांगापांग होते.
बरे जालियासी अवघे सांगाती | वाईटाचे अंती कोणी नाही|
हे जीवनयात्रेतील हे निर्घृण सत्य माणसाला फार ऊशीरा समजते.म्हणूनच अविनाशी काळाच्या प्रवाहाचे गुह्य समजून सर्वच विनाशी गोष्टींचा फुकाचा अहंकार टाकून दिला पाहिजे.आणि मनाच्या संपूर्ण निरोगी शक्तीनिशी नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे.
काही तासानंतर नव्या वर्षाचा सूर्योदय होणारच आहे.
“जुने जाऊदे मरणालागूनी |जाळुनि किंवा पुरुनी टाका”|
असे कवीवर्य केशवसूतांनी म्हटल्याप्रमाणे नव्या वर्षाची नवलाई कमी होत नाही.रात्री बारा वाजेपर्यंत तो जागा राहणार आहे.गतसालच्या दुःखाचे ओझे घेऊन नव्या
वर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहे.
मध्यरात्री धुंद बेधुंद अवस्थेतील तरुणाई सरत्या वर्षाला निरोप देईल!केवढां ऊत्सव! केवढा गाजावाजा!केवढं कौतुक!अज्ञानपर्वातून माणूस विज्ञानयुगात केव्हाच स्थिरावला.अमर्याद सृष्टीचे गूढ उकलले.प्रचंड शोध लागले.अजस्त्र यंत्रे निर्माण झाली.खिशात हातात बसेल एवढे भ्रमणध्वनी आले.दळणवळण विलक्षण टप्प्यात आले.संवादातील अंतर केव्हाच संपून गेले.अनोळखी व्यक्तीमध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.हजारो वर्षांचा माणसांचा इतिहास आहे.पृथ्वीवरचा तो नायक आहे.संस्कृती आल्या आणि लयाला गेल्या.काही नव्याने उदयाला आल्या.माणसाची केसरचना बदलत गेली.पोशाख बदलला.अलंकार बदलले.यातही काही आता अपूर्वाई राहिली नाही.मात्र माणूस तसाच राहिला.माणसाचा आतला हिंस्रपणा चिरंतन राहिला.
जुन्या परंपरांना कवटाळणारा आजचा सुटा बुटातला माणूस सत्यनारायणाच्या पूजेलाही बसतो आहे.बुवाबाजीला शरण जात आहे.अंगारे-धुपारे लावत आहे.कसला आला आहे वैज्ञानिक दृष्टिकोण! केवळ अडाणीपणा,नुसता भंपकपणा!नुसती अंधश्रध्दा! पैशासाठी,जातीसाठी धर्मासाठी रक्तपात,हिंसाचार ही नित्याची बाब झाली आहे. जगातले सर्वच धर्म दया,प्रेम,शांतीचा संदेश देतात.मग खरा धर्म कोणता?बलात्कार,खून,मारामाऱ्या कोणत्या धर्मात बसतात? “खरा तो एकचि धर्म.जगाला प्रेम अर्पावे” वीतभर पोटासाठी पिता- पुत्र,भाऊ -भाऊ,शेजारी-शेजारी यांच्यामध्ये आतंक चालू आहे.मंदिराभोवती फेऱ्या घालणारा पुजा-अर्चेत रमणारा,व्रतवैकल्ये पाळणारा,उपासतापास करणारा माणूस धर्मनिष्ठ आहे?दया,क्षमा,शांती,परोपकार ही तर सर्व धर्माची शिकवण आहे.तर मग एकमेकांचा क्षुल्लक कारणासाठी,क्षणभंगुर सुखासाठी जीवावर का उठतो बरे माणूस?हा माज,हा उद्दामपणा सरत्या वर्षाबरोबर का बरे जात नाही? की तसाच अव्याहतपणे सरत्या वर्षाबरोबर वाहत राहणार?
मग कसला सरत्या वर्षाला निरोप – आणि कशाचे स्वागत?फक्त हव्यास!फक्त स्वार्थ! फक्त अहंकार! सत्तेचा अहंकार,संपत्तीचा अहंकार,जातीचा अहंकार,धर्माचा अहंकार यामुळे माणूस माणसापासून दुरावला आहे.नम्रता,विनयशीलता,जेष्ठांचा आदर अशा संस्काराचा ऱ्हास होऊ लागला आहे.कोणीच कोणाचे ऐकत नाहीत.असभ्य वर्तन,ऊर्मट भाषा,मुजोरपणा हे सारं मन विषण्ण करणारे आहे.जे काल होत ते आजही आहे,उद्याही असणार आहे.काळ अखंड चालणारा आहे.वर्षामागून वर्षे जाणार आहेत.सरत्या वर्षामागे आपण काय मागे टाकणार आहोत.नववर्षाचे स्वागत करताना कसला संकल्प करणार आहोत.जर सरत्या वर्षाला निरोप देताना हे सारं आपल्या सोबतच राहणार असेल तर निरोप ही केवळ अर्थहीन औपचारिकता होईल.कवी कुलगुरू केशवसुत म्हणतात “जुने जाऊ दे मरणा लागूनी,जाळूनी अथवा पुरुनी टाका.”अनिष्ट विचार,रूढी परंपरा’अंधश्रद्धा यांना निरोप देऊन नव्याचे स्वागत केले तरच तो एक सुंदर निरोप आणि स्वागत ठरेल. एकीकडे,दैन्य,दारिद्र्य,लाचारी आणि मातीमोल जगणे आहे.दुसरीकडे मद्यधुंद,बेभान होऊन थिरकणं आहे.आज मध्यरात्री जगभर नव्या वर्षाचा उत्सव होईल.दारूच्या,मांसाहाराच्या पार्ट्या होतील,जागरणी होतील.एकच जल्लोष होईल.कारण खात्री आहे.आत्ताचा क्षण आपला आहे.उद्याची काय पर्वा.एवढी बेधुंद स्थिती आहे.सारं काही संपलेलं नाही.आशा संपलेली नाही.सारे काही ठीक होईल ही आशा आहे.माणसाला बदलण्याची शक्ती आहे का कोणाकडे?माणसाच्या स्वभावाचे नाना प्रकार आहेत.या जगात जशी सज्जन,ऊदार,सहृदय,प्रेमळ माणसे आहेत.तशी दुष्ट,क्रुर,हिंसक,स्वार्थीही आहेत.माणूस बदलणे सोपे नाही.धर्मगुरू,महात्मे यांनी कमी का प्रयत्न केले?वर्षे सरतील,काळ लोटेल
परंतु माणूस आहे तसाच राहील,- पूर्वीसारखा – सनातन – अपरिवर्तनीय.तरीही आपण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ या.नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

प्राचार्य बी एस जाधव
बांबवडे ता पलूस जि सांगली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!