ताज्या घडामोडी

तुमच्यामुळेच आम्हास खरे शिवराय कळाले…!

Spread the love

भारत भूमीत शिक्षणाचे बीज पेरणारे,स्त्री शिक्षणाचा पाया घालून, बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे,सत्यशोधक समाज संस्थापक,महान रचनात्मक,तत्त्ववेत्ता,रणपुरुष,राष्ट्रपिता,महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी झाला,आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये शिक्षणक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
अखंड विश्वाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून ज्यांनी केवळ देशालाच नव्हे,जगालाच नव्हे, तर अखंड विश्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी विचार दिला.महात्मा फुलेंचा कुठल्या जाती-धर्माला विरोध नव्हता, तर त्यांचा अनिष्ट रूढी,प्रथा-परंपरांना विरोध होता.अस्पृश्य,बहुजनांसाठी, जनसामान्यांसाठी खुप मोलाचं असं काम केलं,हक्काची जाणीव करून दिली. १ जानेवारी १८४८ ला पुणे येथे भिड़े वाड्यामधे पहिली शाळा काढण्याचे काम महात्मा फुले यांनी केलं. आणि त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना म्हटले की,
विद्येविना मती गेली||मतीविना नीती गेली|| नीतीविना गती गेली|| गतीविना वित्त गेले||वित्ताविना शूद्र खचले||
इतके अनर्थ एका अविद्येने केले||
अशा भयावह परिस्थितीमध्ये शाळा काढून स्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे ही भारताच्या इतिहासातील एक फार मोठी आश्चर्यकारक घटना होती…! स्त्रीयांसाठी शिक्षणाचे कार्य राबविणे म्हणजे ‘अग्निदिव्यच’ होते,तेव्हा महात्मा फूलेंनी सावित्रीबाईंना सोबत घेऊन कोणाच्याही विरोधाला न जुमानता निर्भयपणे सावित्रीबाई पण स्वतः शिकल्या,शिक्षिका झाल्या,मुलींना शाळेत शिकवलं!
महात्मा फुले एक चांगले बांधकामतज्ञ होते, त्यांनी कात्रजच्या बोगद्याचे काम केलं, खडकवासला धरणाचे काम केलं,मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्टेशनचे बांधकाम केले.ते सन १८७६ ते १८८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यातून त्यांनी गोरगरीब जनतेची अनेक कामे केली, दारूबंदी विरुद्ध लढा दिला, दारूच्या विक्रीचे परवाने रद्द केले,लोकांसाठी वाड्यावर, वस्त्यावर नळाच्या पाण्याची, लाईटची,सुसज्ज रस्त्यांची व्यवस्था केली. त्या काळातील अनाथ,विधवा,अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अशा अनेक स्त्रियांची लेकींसारखी बाळंतपणे स्वतः सावित्रीबाईनी केली.महात्मा फुले-सावित्रीबाई फलेंमुळेच आज महिला सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या आहेत. पहिला “शिवजयंती उत्सव” महात्मा फुलेंनी १९-फेब्रुवारी १८६९ ला रायगडावर सुरू केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने सर्वत्र जगभर शिवजयंती साजरी केल्या जाऊ लागली.
त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा बंद केल्या.आपल्या मिळकतीचे सर्व पैसे शिक्षणासाठी खर्च करून शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, देशातील पहिले नाटक तृतीय रत्न लिहिले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला या साहित्यातून अन्यायाला वाचा फोडली तसेच भारतीय समाजाला परिवर्तनाची खुप मोठी प्रेरणा मिळाली. अज्ञान, अंधश्रद्धा,स्त्रीभ्रूण हत्या, अस्पृश्यता या ज्वलंत प्रश्नांवर आयुष्यभर लढा दिला.पुढे जनतेनेच कार्याचा गौरव करतांना त्यांना “महात्मा” ही मानाची पदवी दिली.
सावित्रीबाई-जोतिबांनी अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्या भिड़े वाड्याच्या तुटलेल्या पायऱ्या अजून फार काळ आपला तग धरतील असे वाटत नाही…! भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होऊन गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना व नागरिक सातत्याने आंदोलने,उपोषणे करीत आहेत त्यामुळे आतातरी शासनाने निधीची तरतूद करुन भिडेवाडा “राष्ट्रीय स्मारक” म्हणून जतन करणे महत्त्वाचे आहे, हीच महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने खरी आदरांजली ठरेल,त्यांच्या कार्याचा आपण खरा गौरव केला असे म्हणता येईल…! या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचार-कार्याला कोटी-कोटी प्रणाम करतो आणि लेखणीला पूर्णविराम देतो….!
*———#शब्दांकन#———-* *शिवश्री प्रा.सतिष उखर्डे(प्रसिद्ध व्याख्याते,लेखक तथा इतिहास अभ्यासक )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!