ताज्या घडामोडी

कोकणचा कॅलिफोर्निया निश्चितच होईल , निलेश सांबरे यांचे प्रतिपादन

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.२८
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि समृद्ध कोकण प्रदेश संघटना यांच्यातर्फे ग्लोबल कोकण उद्योगजक आणि कोकण आयडॉल पुरस्कार जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांना नुकताच देऊन गौरविण्यात आले.

सत्काराला उत्तर देतांना निलेश सांबरे यांनी सांगितले की, हा सत्कार कोकणातील एका शेतकरी पुत्राचा आहे. कोकण भूमी प्रतिष्ठान आणि समृद्ध कोकण प्रदेश संघटना आयोजित ग्लोबल कोकण उद्योग परिषद आणि कोकण आयडॉल पुरस्कार सोहळ्याचा हा कार्यक्रम म्हणजे कोकणच्या भविष्याची दिशा ठरवणारा स्तुत्य उपक्रम आहे.

गेली अनेक वर्षे अनेक व्यक्ती, अनेक संघटना कोकणच्या विकासासाठी चढाओढीनं प्रयत्न करतात. मात्र, कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणा जेवढ्या झाल्या तेवढाच आपला कोकणी माणूस मात्र विकासाच्या लखालखाटातील अंधाराच्या बेटांमध्ये हरवून गेल्याचे चित्र दिसत आहे. यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे.

सांबरे पुढे म्हणाले की, आपण कोकणी माणसं कला-संस्कृती-परंपराप्रिय आहोत. दशावतारापासून ते नमन ते आपल्या पालघर पट्ट्यातील तारपा नृत्य सारंच आपण जपलं, जोपासलं. पण त्याचवेळी आपल्यातील कातळावर शिल्प कोरुन कलेला अजरामर ठेवण्याची, भल्या मोठ्या उंचीवर स्वराज्याची राजधानी रायगड उभारण्याची, उसळत्या लाटांना रोखणारा सिंधुदुर्ग साकारण्याची आपली जिद्द कुठे गेली? असा प्रश्न पडतो. आज काळ बदलला आहे. आव्हानंही बदलली आहेत. त्या आव्हानांना आपल्याला तोंड देत पुढे जावं लागेल. आपली जिद्द, आपले प्रामाणिक परिश्रमच आपल्याला नव्या काळात पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरतील.

नव्या काळात आपल्याकडे असलेल्या निसर्ग संपन्नतेला उपयोगात आणत आपण शेतीला व्यावसायिक तंत्रानं केलं पाहिजे. एकदा केलं आणि मग गजाली करत बसलो असं नसावं. पाणी इथं भरपूर कोसळतं. पण ते वाहून जातं. आता त्या पाण्याला वर्षभरासाठी पुरवत शेतीचा, बागायतीचा बारामाही फायदेशीर विकास घडवला पाहिजे.

शिक्षणात आपला सिंधुदुर्ग जिल्हा १०० टक्के साक्षर. पण याच कोकणाच्या ५ जिल्ह्यांमधील किती माणसं केंद्रीय किंवा राज्याच्या सेवांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेनं गेली अनेक वर्षे आपल्या मातीतील आपल्या माणसांना प्रशासकीय सेवांच्या यूपीएससी, एमपीएससी, पोलीस भरतीच्या परीक्षांचं प्रशिक्षण देत प्रयत्न सुरु केला आहे. एकही रुपया न घेता व्यावसायिक तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिलं जातं. आज आपली अनेक मुलं हे प्रशासकीय सेवेत पोहचू लागली आहेत. पोलीस भरतीत निवडली जात आहेत. सध्या दोन जिल्ह्यांमध्ये सहा सीबीएसई शाळा सुरु केल्या आहेच. शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, मच्छिमारांची मुलं इंग्रजी शाळेत शिकावी. हा प्रयत्न आहे. हा प्रयोगही आता वाढत आहे. लवकरच कोकणातील प्रत्येक तालुक्यात अशा शाळा उभारण्याचा प्रयत्न असेल. सामान्यांच्या नव्या पिढीचं चांगल्या शिक्षणाचं स्वप्न साकारण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यासाठीच एक दृष्टीहिनांची मोफत निवासी शाळाही चालवतो.

आरोग्याच्या बाबतीतही मोठी हेळसांड आहे. पालघरमध्ये जिल्हा रुग्णालय आजवर नाही. आम्ही जिजाऊच्यावतीनं भगवान सांबरे रुग्णालय सुरु केले. सुसज्ज असं. हजारो रुग्ण लाभ घेतात. सारं काही सेवाभावी आहे. स्थानिकांच्या सेवेसाठी अशी सेवाभावी रुग्णालयं जिल्ह्या-जिल्ह्यात पाहिजेत. तसंच कोकणातील सुंदर वातावरणात व्यावसायिक पातळीवर रुग्णालयं उभारून मेडिकल टुरिझमचा नवा पर्यायही निवडला पाहिजे. आपली अतिथ्यशीलता, कनवाळू स्वभाव हा त्यासाठी पुरक आहे.

कोकणाच्या कॅलिफोर्नया करण्याच्या घोषणांविषयी बोललो. त्या खऱ्या कॅलिफोर्नियातच सिलिकॉन व्हॅली ही अमेरिकेचीच नाही तर जगाची डिजिटल राजधानी आहे. आपल्या कोकणात असा सॉफ्टवेअर उद्योग खरंच अशक्य आहे का? सौंदर्य आहे, स्वच्छता आहे. आपण सोयी-सुविधाही मिळवून देवूया. संकल्प करुया. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी असं सॉफ्टवेअर पार्क बनवूया. कोकणी बुद्धिमत्तेच्या बळावर कॅलिफोर्नियासारखी कोकण व्हॅली उभारणं शक्य आहे.

जगातील सर्वात मोठे उद्योग सध्या डेटा इंडस्ट्रीचेच आहेत. भरातातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानीही म्हणालेत, डेटा हेच उद्याचे इंधन असेल. तेल असेल. त्यामुळेच ते जियोच्या माध्यमातून गगनाला भरारी घालू लागलेत. आपणही ते ओळखले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!