क्रीडा व मनोरंजन

मातोश्री रमाबाई विद्यालय-कल्याण सुपर लीगमध्ये

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, मातोश्री रमाबाई गायकवाड विद्यालय-कल्याण संघाने विलेपार्लेच्या श्री माधवराव भागवत हायस्कूलचा ६० गुणांनी पराभव केला आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर शालेय विनाशुल्क कबड्डी स्पर्धेच्या सुपर लीगमध्ये शानदार प्रवेश केला. अष्टपैलू शिवम म्हात्रे व चढाईपटू अथर्व दळवी यांना उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विराज मोरे, क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, कबड्डी मार्गदर्शक प्रॉमिस सैतवडेकर, कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळीनी गौरविले.

आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित आंतर शालेय कबड्डी स्पर्धेमधील पाचव्या टप्प्यात मातोश्री रमाबाई गायकवाड विद्यालयाने शिवम म्हात्रे, जयवंत, सोहम लोखंडे यांच्या अष्टपैलू खेळामुळे पहिल्या डावातच भागवत हायस्कूल संघावर तीन लोण देत ३८-७ अशा आघाडीसह विजयी कूच केली. प्रतिस्पर्ध्यांच्या अथर्व दळवी व चिन्मय लाड यांनी प्रतिकार करूनही गायकवाड विद्यालयाने ८०-२० असा मोठा विजय संपादन केला. गायकवाड विद्यालयासह माणेकलाल मेहता एमपीएस स्कूल-घाटकोपर, अँटोनीया डिसोझा हायस्कूल – भायखळा, श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी, सेंट झेव्हियर हायस्कूल-कांजुरमार्ग आदी संघांनी अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. चँम्पियन ऑफ चँम्पियन ठरण्यासाठी २६ फेब्रुवारीपासून लढतींना दादर-पश्चिम येथील अमरहिंद मंडळाच्या मैदानामध्ये संयोजक अश्विनीकुमार मोरे व माजी शरीरसौष्ठवपटू वैभव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!