महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी विद्यमान आमदारांची माजी आमदारांना साद

Spread the love

कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना अनेक शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक फीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील कोणताही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष असलेल्या माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक संस्थाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी विनंती करावी, अशा आशयाचे पत्र आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दिले आहे.

कोविड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि राज्यात थैमान घातले असून मावळ तालुक्यातील कोरोना परिस्थितीशी आपण सर्वजण संघर्ष करीत आहोत. मागील दीड वर्षात या कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील व्यक्ती दगावल्या आहेत. जीवितहानी बरोबरच संपूर्ण अर्थव्यवस्था या संकटामुळे खिळखिळी झालेली असून त्यामुळे सर्वसामन्यांची आर्थिक गणिते कोलमडल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत, याकडे शेळके यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार बंद झाले असून व्यवसाय देखील ठप्प झाले होते. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील बसला असून मावळ तालुक्यात प्रामुख्याने नोकरदार वर्ग, छोटे दुकानदार, रिक्षावाले, टेम्पोवाले, टपरीधारक तसेच पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारे व्यवसाय अशा दैनंदिन व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे अशा विदारक परिस्थितीत आपल्या मुलांची शैक्षणिक फी भरणे या पालकांना अशक्य झालेले आहे, असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

आपण स्वतः मावळ तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आहात. त्यामुळे मावळ तालुक्यातील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा-कॉलेज असणाऱ्या संस्थांचे संस्थापक, संस्थाचालक, अध्यक्ष, सचिव, संचालक, प्रतिनिधी यांसोबत एकत्रित बैठक घेऊन सदर बैठकीत संस्थेच्या प्रतिनिधींना फी सवलतीसाठी विनंती करावी, अशी अपेक्षा शेळके यांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना 2021-22 यावर्षीच्या राज्य शासनाने दिलेल्या फी सवलती व्यतिरिक्त शैक्षणिक फी मध्ये सवलत देण्यासाठी आपण प्राधान्याने लक्ष घालावे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळणार असून पुढील आगामी शैक्षणिक वर्षात फीच्या कारणामुळे कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आपल्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील शैक्षणिक संस्थांची बैठक लवकरात लवकर आयोजित करून सदर बैठकीत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!