ताज्या घडामोडी

कोकण नेस्ट रिसॉर्ट मध्ये प्रथमच मराठमोळी दीपावली संध्या

Spread the love

खंडाळा – गणपतीपुळे येथील पर्यटनाचा मानबिंदू असलेले डॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट निवेंडी चा परिसर दिवाळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मराठी स्वरांनी, सुरांनी एकदम सुरेल होऊन गेला. निमित्त होते कोकण नेस्ट मधील पहिल्यावहिल्या स्वरयात्री प्रस्तुत ‘दीपावली संध्या’ कार्यक्रमाचे. या मैफिलीत प्रसिद्ध गायक श्री विवेक बापट, गायिका कु.योगिता दिवेकर, सौ. अदिती केळकर यांच्या ‘निरागस सुरांनी’ पर्यटक, रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या कोकण नेस्ट च्या संचालिका गौरी महाजन – वेलणकर व संचालक डॉ.चंद्रशेखर निमकर यांच्या कल्पनेतून ‘दीपावली संध्या’ आयोजिली होती. आकाशवाणी स्टेशन चे पूर्व डिरेक्टर श्री. श्रीकांत ‌ठकार सर आणि डॉ. शिरीष वेलणकर सर या मैफिलीस आवर्जून उपस्थित होते. प्रसिद्ध कलाकार पर्णिका भडसावळे हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकण नेस्ट चा परिसर मराठमोळ्या संस्कृतीने नटलेला दिसत होता. पणत्या, रांगोळ्या, आकाश कंदील आणि थंडीची हलकी लाट अशा सुरेख वातावरणात मराठी स्वरांनी उपस्थितांना मोहून टाकले. मैफिलीच्या पूर्व रंगात ‘कृष्ण’ आणि ‘पांडुरंग’ यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या छटा दर्शविणाऱ्या गीतांची उधळण आणि उत्तर रंगात नाट्यसंगीत, भावगीत, अभंग अशा सुरावटींचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. ‘ॐकार प्रधान ‘ या गणेशाच्या गीताने मैफिलीची सुरवात झाली.
पहा रे परमेशाची लीला, शब्दांच्या पलीकडले, वृंदावनी वेणू, देवाघरचे ज्ञात कुणाला, कौसल्येचा राम, खेळ मांडियेला, अमृताहुनी गोड, कानडा राजा पंढरीचा या सुरावटींना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला हार्मोनियम साथ श्री राजेंद्र भडसावळे, तबलासाथ श्री अमेय भडसावळे आणि तालवाद्य श्री महेश भिडे यांनी केली. सर्वांना अतिशय मंगलमय आणि प्रसन्न अशा वातावरणात दीपावलीच्या शुभेच्छा देत डॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्ट च्या गौरीताई वेलणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!