क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्राच्या पुरुष-महिला खोखो संघांची विजयी घोडदौड

Spread the love

ओडिशा, दिल्ली संघांना नमवले. महाराष्ट्र गटात अव्वल

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

अहमदाबाद, १ ऑक्टोबर, (क्री. प्र. ) : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खोखो संघांनी विजयी घोडदौड कायम ठेवत साखळी सामन्यात सलग दोन विजय नोंदवून पदकाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली आहे. ३६ वी नॅशनल गेम्स, संस्कारधाम अहमदाबाद, गुजरात येथे सुरू असून आज झालेल्या खो-खो सामन्यात महाराष्ट्राने ओडिशा व दिल्लीला नमवत गटात अव्वल स्थान मिळवले आहे.

महिलांच्या खोखो सामन्यात दुस-या दिवशी महाराष्ट्राने ओडिशाचा ३०-२० असा दहा गुणांनी पराभव करुन सलग दुसरा दणदणीत विजय साकारत गटात अव्वल स्थान मिळवले. सलग दुसर्‍या विजयात महाराष्ट्राच्या संपदा मोरे, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, प्रियांका इंगळे, शीतल भोर यांची कामगिरी लक्षवेधक ठरली. संपदा मोरेने अष्टपैलू कामगिरी बजावताना २ मि. पळतीचा खेळ केला व तीन गुण देखील मिळवले. अपेक्षा सुतारने १:४० मि. पळतीचा खेळ तर केलाच शिवाय एक गुण मिळवला. रेश्मा राठोडने नाबाद १:३० मि. संरक्षण केले. प्रियांका इंगळेने अष्टपैलू खेळ करताना १:३० मि. संरक्षण केले आणि आठ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शीतल भोरने सहा गुणांची कमाई करत सामना गाजवला. ओडिशा संघाकडून पुष्पाने २:१० मि. तर सस्मिताने १:३० मि. पळतीचा खेळ केला. या लढतीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सांघिक व नियोजनबद्ध खेळ करुन ओडिशाला नमवले. आता महाराष्ट्रचा महिलांचा अखेरचा साखळी सामना पंजाब संघाविरुद्ध रविवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.

पुरुष सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा ३६-२२ असा एक डाव आणि १४ गुणांनी दणदणीत विजय मिळवत सलग दुसरा विजय साकारला. मध्यंतराला ३६-१२ अशी मोठी आघाडी घेतली होती त्याचा फायदा उचलत महाराष्ट्र संघाने डावाने विजय संपादन करुन गटात आपली स्थिती भक्कम केली आहे. महाराष्ट्रच्या आक्रमणासमोर दिल्लीचे खेळाडू अक्षरश: ढेपाळले. प्रतिक वाईकर (१:२० मि.), गौरव (४ गुण), सुयश गारगाटे (१:३० मि.), रामजी कश्यप (१:५० मि. व २ मि.), मिलिंद करपे (१० गुण), निहार दुबळे (८ गुण), सुरज लांडे (४ गुण), अक्षय मिसाळ (४ गुण), दिलराज सेंगर (१:३० मि.), राहुल मंडल (नाबाद १:५० मि.) या महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरली. दिल्लीकडून राजवीर कुमार (१ मि.), गौरव (४ गुण) या दोघांचा अपवाद वगळता अन्य कोणताही खेळाडू विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. आता महाराष्ट्र संघाचा साखळीतील तिसरा सामना पश्चिम बंगालविरुद्ध रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या लढतीनंतर बाद सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

आज झालेल्या इतर सामन्यात पुरुषांमध्ये कर्नाटकने आंध्र प्रदेशचा २८-२६ असा २:३० मि. राखून २ गुणांनी पराभव केला. तर महिलांच्या सामन्यात ३४-२८ असा सहा गुणांनी पराभव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!