ताज्या घडामोडी

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

Spread the love

(रवींद्र मालुसरे : मुंबई )मराठी माणसांची जुनी संस्था म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेचे कार्य खोलवर रुजले आहे, महापालिका व न्यायालयाचा निर्णयामुळे ही  संस्था  गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. संस्थेचे कार्यालयीन कामकाज आणि उपक्रम थांबले आहे, परंतु या संस्थेचे कामकाज थांबणार नाही तर स्वतःच्या जागेत यापुढच्या काळात तुम्ही असाल अशा प्रयत्नात आपण राहू असे आश्वासन ना सुभाष देसाई यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या दादर येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना दिले. याप्रसंगी रमाधामचे अध्यक्ष चंद्रकांत तथा चंदूमामा वैद्य, खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री अरविंद सावंत हे उपस्थित होते. देसाई पुढे असेही म्हणाले की, वर्तमानपत्रातून जनसामान्यांच्या समस्यांना निस्वार्थीपणे व परखडपणे वाचा फोडणाऱ्या या संस्थेची समाजासाठी गरज आहे. . रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य आपल्या भाषणात म्हणाले की, शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे आणि या संस्थेचे ऋणानुबंध घनिष्ठ होते, तुमच्यापैकी त्यांच्या परिचित जुन्या लोकांची आठवण ते अनेकवेळा काढत असत. बाळासाहेबांचे आणि तुमच्या संस्थेचे ऋणानुबंध जपण्यासाठी माझी ही जागा संस्थेच्या कामकाजासाठी विनामुल्य दिली आहे. तुमच्या स्वतंत्र जागेसंदर्भात मी स्वतःहा यापुढे पाठपुरावा करणार आहे.
तर खासदार अरविंद सावंत यांनी सरकारने जागा उपलब्ध करुन दिली तर ती वास्तू माझ्या फंडातून बांधून देईल असे आश्वासन दिले.
संस्थेचा गेल्या ७२ वर्षाच्या चळवळीचा आढावा घेत दादर सारख्या मध्यवर्ती ठिकाणची जागा मामांनी संस्थेच्या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सार्वजनिक जीवनात वावरताना चांगुलपणा असलेली काही भली माणसं आपल्याला भेटतात. चांगल्याच्या मागे उभे राहण्यात त्यांच्यात अंतर्यामी कणव तर असतेच पण त्यांच्यात निस्वार्थ भाव सुद्धा घट्ट दाटून असतो. मामांनी  आयुष्यभर समाजात जे निराधार होतात त्यांना ‘आधार’ देण्याचे काम सतत केल्याचे नोंद इतिहासात घेतली जाईल असे भावपूर्ण उदगार देसाई साहेबांनी
यावेळी काढले. मैत्रजागर या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन दुर्गमहर्षी आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक लेखक आप्पा परब यांच्या हस्ते करण्यात आले तर ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात होणारे बदल सांगताना संघाकडून कोणत्या कामाची भविष्यात गरज आहे याचे विवेचन केले. माजी अध्यक्ष विजय ना कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, श्रीनिवास डोंगरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, सुनील कुवरे, राजन देसाई, प्रशांत भाटकर, चंद्रकांत पाटणकर, अरुण खटावकर उपस्थित होते.
मराठी भाषेचे संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी विशेष प्रयत्न राज्यशासनाच्या वतीने केले जात आहेत. यामध्ये सर्व भाषांच्या शाळांमध्ये मराठीची सक्ती, दुकानांवरील मराठी भाषेतील पाट्यांचा कायदा केला. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात मराठीचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी देखील कायदा केला. आगामी काळात दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी सर्व नगरपालिका आणि महामंडळ प्राधिकरणात कार्यशाळा घेतली जाईल. याशिवाय दुकानांच्या पाट्यांचे निरीक्षण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले.
राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सर्व दुकानांना या महिनाभराच्या कालावधीत मराठी पाट्या लावाव्या लागतील, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उद्योग आणि मराठी भाषा मंत्री ना सुभाष देसाई यांनी याप्रसंगी दिला.
मराठीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा याकरिता आत्तापर्यंत ७५ हजार ऑनलाईन याचिका क्यूआर कोड वापरून दाखल झालेल्या आहेत. या जनअभियानाला सर्व स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेक मान्यवर लेखक, विचारवंत व मराठी कलाकार आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी ऑनलाईन याचिका दाखल करून आपला सहभाग नोंदविला आहे. तुम्ही वृत्तपत्र लेखकांनी या कामाला जोडून घ्यावे
असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले. तर मैत्रजागर व्यासपीठावरून शरद वर्तक, मनोहर साळवी, प्रकाश नागणे, नंदकुमार पाटील, भाऊ सावंत यांनी आपले विचार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!