ताज्या घडामोडी

शिक्षणाशिवाय समाजाचे परिवर्तन अशक्य…….डॉ. प्रतापसिंग राजपूत    

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी)

समाजात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी इथला गरीब, वंचित माणूस शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलाच पाहिजे. संविधान तयार करताना उपेक्षितांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतू त्याकाळी डॉ. आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. शिक्षणाशिवाय समाजाचे परिवर्तन अशक्य असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, भूगोल विभाग व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने २९ वा विद्यापीठ नामाविस्तार दिन, जागतिक भूगोल दिन व मकर संक्रांत या त्रिवेणी दिनाचे औचित्य साधून व्याख्यानात ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचारातील योगदान ‘ या विषयावर सोमवारी (ता.१६) रोजी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. शिला स्वामी, डॉ. संध्या डांगे, डॉ. अरूण बावा आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. राजपूत म्हणाले की, विद्यापीठ नामाविस्तार दिनाचा पूर्वतिहास सांगताना सर्वांनी जातीय दृष्टीकोन बदलून शैक्षणिक मतप्रवाह बदलणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होईल. यासाठी राजकीय लोकशाहीचे रुपांतर सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. नामंतराचा इतिहास सर्वांनी वाचून तो समजून घेतला पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.          अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की, तरुणांनी सर्वगुण संपन्न बनण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःचा विकास साधावा. सध्या विद्यार्थ्यांसमोर विविध आव्हाने उभी असताना आपण स्वतःला काळानुरूप बदलले पाहिजे. प्रा. डॉ. सतिश शेळके, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. किरण राजपूत, डॉ. सुजित मटकरी, प्रा. नागनाथ बनसोडे, डॉ. राजू शेख, प्रा. अशोक बावगे, सकाळी यिनचे महाविद्यालयीन अध्यक्ष अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुशिल मठपती यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राम बजगिरे तर डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी आभार मानले. यावेळी विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होत्या.  फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात नामविस्तार दिना निमित्त व्याख्यानाप्रसंगी डॉ. प्रतापसिंग राजपूत बोलताना प्राचार्य अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!