क्रीडा व मनोरंजन

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी घोडदौड ५५ वी पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

उस्मानाबाद २१ नोव्हें. (क्री. प्र.) महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो खो स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेश वर डावाने विजय साजरे केले.

भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहेत.

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर १७-७ असा १:१० हि. राखून डावाने धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप व प्रतीक वाईकर (प्रत्येकी २:४० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय मासाळ (२:१० मि‌. व ३ गुण), लक्ष्मण गवस (२:१० मि. संरक्षण व २ गुण), सुरज शिंदे (२:२० मि. संरक्षण) व गजानन शेंगाळ (३ गुण) यांनी आपल्या शानदार खेळाची झलक दाखवताना महाराष्ट्राला डावाने विजय मिळवून दिला. पराभूत उत्तराखंडच्या शशिकांतने एकहाती लढत दिली.

महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (५ गुण), स्नेहल जाधव (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), प्रतीक्षा बिराजदार (२:४० मि. संरक्षण), प्रीती काळे व श्रेया सनगरे (प्रत्येकी २:१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (४ गुण), दिपाली राठोड (३ गुण), अपेक्षा सुतार व पूजा फरगटे (प्रत्येक २ गुण) यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय मिळवणे सहज शक्य झाले. पराभूत अरुणाचल प्रदेशच्या प्रेमाने थोडीफार चांगली कामगिरी केली.

महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा बलचा १८-४ असा एक डाव १४ गुणांनी धुवा उडवला. गोव्याच्या काशी गांवकरने ४:२० म. संरक्षण व ३ गुण, अश्विनी वेळीपने ४:३० मि. व २ गुण, दीप्ती वेळीपने नाबाद ४:३० मि. संरक्षण करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर पराभूत सीमा सुरक्षा बलच्या अश्विनी चव्हाणने एकाकी लढत दिली.

पुरुषांच्या सामन्यात विदर्भाने दुबळ्या जम्मू-काश्मीरचा २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला. अक्षय उमाते, दिलराजसिंग सेनगर, राज सिसोदिया त्यांनी चांगला खेळ केला तर जम्मू-काश्मीरच्या कोणत्याही खेळाडूला विशेष प्रभाव पडता आला नाही.

कोल्हापूरच्या महिलांनी सुद्धा जम्मू काश्मीर वर ३२-६ असा एक डाव २६ गुणांनी धुवा उडवला व पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूरने त्रिपुराचा २८-८ असा एक डाव २० गुणांनी पराभव केला.
—–
अन्य निकाल : महिला :
मध्य भारत वि.वि. भारतीय तिबेट सीमा सुरक्षा बल २५-१ डावाने, हरियाणा वि.वि. बिहार २७-४ डावाने, प. बंगाल वि.वि. सीमा सुरक्षा बल २८-५ डावाने, दिल्ली वि. वि. उत्तराखंड १९-५ डावाने, विदर्भ वि.वि. छत्तीसगड ८-६ डावाने,

ओडिशा वि.वि मणिपुर १८-३ डावाने.

पुरुष : पंजाब वि.वि. भारतीय तिबेट सुरक्षा बल २५-७ डावाने, प. बंगाल वि.वि. चंदीगड १६-११ डावाने, ओडिशा वि. वि. सीमा सुरक्षा बल १७-६ डावाने, भारतीय रेल्वे वि. वि. २९-४ डावाने, मणिपूर वि. वि. अरुणाचल प्रदेश १६-९ डावाने.
———-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!