आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

नवले पुलाजवळ भरधाव टँकरच्या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान..   

अपघातामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. 

Spread the love

नवले पुलाजवळ भरधाव टँकरच्या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान. 

आवाज न्यूज: पुणे: २० नोव्हेंबर .

पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. नर्हे स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील वाहनांना धडक दिली. त्यात प्रामुख्याने कारचा समावेश आहे. त्यानंतर ओम लॉजिंगच्या समोरील बाजूला हा ट्रेलर जाऊन थांबला. हा ट्रेलर सातारहून मुंबईच्या दिशेने जात होता. वाहनांची गर्दी असल्यामुळे या भागात संथ गतीने वाहतूक सुरु होती. मात्र, रस्त्याच्या उतारावर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले आणि हा अनियंत्रित ट्रेलर गाड्यांना धडका देत पुढे जात राहिला. यामध्ये अनेक कार उलटल्याची माहिती आहे.

या भीषण अपघातामध्ये अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु होते.नर्हे नजीकच्या परिसरात अपघात झाला आहे. या घटनेची वर्दी मिळताच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आपटत गेल्याची माहिती आहे. या अपघातात  गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, हे तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अपघातातील जखमींना योग्य उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. जखमींवर दीनानाथ मंगेशकर आणि नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. सततचे अपघात रोखण्यासाठी नवले पुल हा वडगाव पुलाला जोडण्यासंदर्भातील प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा प्रस्ताव पुणे महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर प्रस्तावाचं गाडे फार पुढे सरकले नसावे. अशातच आता हा भीषण अपघात झाल्याने नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आगामी काळात तरी प्रशासन काही निर्णायक पावले उचलणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!