ताज्या घडामोडी

तर खडतर वाटेचे रूपांतर सुखद वाटेत होईल, शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांचे प्रतिपादन

Spread the love

आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अद्यावत स्वच्छता गृह

पालघर प्रतिनिधी ता.१४
खडतर वाटेचे रूपांतर सुखद वाटेत करावयाचे असेल तर शाळकरी जीवन हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी आपण अविरत मेहनत करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांनी केले.
चहाडे नाका येथील आदिवासी आश्रम शाळेच्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असलेल्या प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे असलेल्या अफाट आकलनशक्ती आणि विलक्षण साहसाचा सकारात्मक वापर केल्यास निश्चितच आपण जीवनामध्ये यशस्वी व्हाल. मात्र आभासी दुनियेपासून आपण सावध राहा असे सांगून जीवनातील विविध प्रसंग सांगितले.

स्वच्छतागृहाचे उद्घाटन पालघर जिल्हा कौशल्य विकास उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या एम जी एन एफ पदावर कार्यरत असलेल्या पल्लवी जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना जोशी यांनी ग्रामीण भागातील मुलींची अल्पवयात होणारी लग्न ही अत्यंत घातक असून अल्पपवयात लग्न करण्यासाठी मुलींनी ठाम नकार द्यायला हवा. विद्यार्थ्यांनी या वयात शिस्त पाळून नियमित अभ्यास करणे आवश्यक असून अद्यावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी सातत्याने धडपडायला हवे असे सांगितले.

मुंबई येथील शिक्षा फाउंडेशन तर्फे चहाडे नाका येथे असलेल्या आदिवासी आश्रम शाळा मासवण येथे सुमारे पंधरा लाख खर्च करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिले. तसेच मुलींना आरोग्य कीट देण्यात आले. या आश्रमशाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात २१७ मुली तर २०० मुलगे असे एकूण ४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

यावेळी मासवण गावचे सरपंच संजय पवार यांनी शाळेला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी ग्रामपंचायत सदैव तयार आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संभाजी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राहुल संखे यांनी केले.

याप्रसंगी मुंबई येथील शिक्षा फाऊंडेशनचे अशोक वर्मा, प्रोजेक्ट चेअरमन नितिज्ञा वाघेला, सुनील पांचाळ, रेणुका वर्मा व शिक्षा फाऊंडेशनचे कार्यकर्ते तसेच शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!