ताज्या घडामोडी

साहित्य हा समाजाचा आरसा असतो…..डॉ. समाधान पसरकल्ले

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता.११ (प्रतिनिधी)

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वैचारिक दृष्ट्या समृद्ध बनण्याकरिता साहित्य खुप महत्वाचे आहे. साहित्यामुळे मनुष्य हा मानसिक व बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ होतो. साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब स्पष्ट केले जाते म्हणून साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे प्रतिपादन उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असणारे प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले यांनी केले.
मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात मराठी पदवी-पदव्युत्तर विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ साक्षेपी समिक्षक प्रा. नरहर कुरूंदकर ” या विषयावर शुक्रवारी (ता. १०) रोजी व्याख्यानामाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. सोमनाथ व्यवहारे, डॉ. नागोराव बोईनवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. पसरकल्ले म्हणाले की, प्रतिकूल काळात साहित्याला वाचा फोडणे खूप कठीण होते. अशावेळी प्रा. कुरुंदकर यांनी विविध प्रकारच्या साहित्य निर्मितीच्या माध्यमातून अनेक व्यक्तीचित्रे रेखाटली. विविध प्रकारच्या लेखकांच्या ग्रंथांचे दर्जेदार व तटस्थ राहून समिक्षा व परीक्षणे केली. समाजातील विविध घटना, प्रसंग व समस्या साहित्याच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ व जाणीवपूर्वक शद्धबद्ध करण्याचा त्यांनी कसोसीने प्रयत्न केला. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यामुळेच समाजाला एकप्रकारची दिशा मिळाली. मराठी साहित्य निर्मितीमुळेच ते नावारूपाला आल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे म्हणाले की, साहित्य माणसाला मानसिक व वैचारिक दृष्ट्या समृद्ध करते. याकरिता विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून बौद्धिक विकास करून घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सोमनाथ व्यवहारे, डॉ . प्रतापसिंग राजपूत, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. राजू शेख, डॉ. रमेश आडे. डॉ. नरसिंग कदम, डॉ. अविनाश मुळे, प्रा. दयानंद बिराजदार, डॉ. अरुण बावा आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अशोक बावगे तर आभार डॉ. नागोराव बोईनवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात डॉ. समाधान पसरकल्ले बोलताना डॉ. अशोक सपाटे, डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. नागनाथ बनसोडे व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!