क्रीडा व मनोरंजन

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा खो खो महाराष्ट्रचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

पंचकुला, हरयाणा, ११ जून, (क्री. प्र.) : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेअंतर्गत हरयाणा येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी बाद फेरीत प्रवेश मिळवत सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल कायम ठेवली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात मुलींच्या संघाने पंजाबवर सहज मात केली तर महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाला विजयासाठी पश्‍चिम बंगालने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राचे दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला.

हरयाणा येथे सुरु असलेल्या स्पर्धेत तिसर्‍या दिवशी सायंकाळच्या सत्रातील साखळी सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पंजाब संघावर १०-८ (१०-४) एक डाव २ गुणांनी विजय मिळवला. प्रथम आक्रमण करणार्‍या महाराष्ट्र संघाने पंजाबचे १० गडी बाद केले; मात्र महाराष्ट्रच्या मुलींनी उत्कृष्ट संरक्षण केल्यामुळे पंजाब संघाला फक्त नऊ मिनीटात ४ गडी बाद करता आले. मध्यंतराला महाराष्ट्रकडे ६ गुणांची आघाडी होती. त्यामुळे पंजाबला फॉलोऑन देण्यात आले. दुसर्‍या आक्रमणातही उत्कृष्ट संरक्षणामुळे पंजाबला ४ गडीच बाद करता आल्यामुळे महाराष्ट्रचा विजय सोपा झाला. विजयी संघातर्फे अश्‍विनी शिंदेने २ मि. ३० सें., नाबाद १ मि. ३५ सें. खेळ केला. तर कौशल्या पवारने २ मि. १० सें. खेळ करुन १ गडी बाद केला. त्यांना प्रिती काळेने ३ आणि वर्षाली भोयेने ४ गडी बाद करुन चांगली साथ दिली. पंजाबतर्फे दमनप्रित कौरने १ मि. ४० सें तर रमणदिप कौरने १ मि. १० सें खेळ करत १ गडी बाद केला. या विजयासह महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलांमध्ये गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राला विजयासाठी पश्‍चिम बंगालने झुंजवले. मध्यंतराला पश्‍चिम बंगालकडे दोन गुणांची आघाडी होती; मात्र नावलौकिकाला साजेसा खेळ करत महाराष्ट्रच्या मुलांनी मध्यंतरानंतर सामन्याचे चित्र पलटवले आणि १८-१५ (८-१०) असा विजय मिळवला. विजयी संघातर्फे रोहन कोरेने १ मि. ३० सें., २ मि. संरक्षण केले तर, आकाश तोगरेने १ मि. ३० सें. खेळ करतानाच ४ गडी बाद केले. रामजीने १ मि., १ मि. संरक्षण करत २ गडी बाद केले, आदित्य कुडलेने १ मि. २० सें., १ मि. संरक्षण करत २ गडी बाद केले. सुफियान शेखने आक्रमणात ४ गडी बाद करुन महाराष्ट्राच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत पश्‍चिम बंगालतर्फे अभिजित चौधरीने २ मि., १ मि. संरक्षणाचा खेळ केला. त्याला सुमन बर्मनने १ मि., १ मि. ३० सें. खेळ करत ५ गडी बाद करुन आणि एसके अलीने १ मि. ३० सें, १ मि. ३० सें. संरक्षण करतानाच २ गडी बाद करुन चांगली साथ दिली. मात्र विजय साकारता आला नाही.

सायंकाळच्या सत्रातील मुलींच्या सामन्यात ओडीसाने कर्नाटकाचा १ डाव ४ गुण राखून पराभव केला. तत्पुर्वी सकाळच्या सत्रातील सामन्यात मुलींमध्ये पश्‍चिम बंगालने राजस्थानचा १ डाव २ गुणांनी, हरयाणाने तामिळनाडू संघावर अत्यंत चुरशीच्या सामन्यात १ गुणांनी विजय मिळवला. मुलांमध्ये आंध्रप्रदेश संघाने छत्तीसगड संघावर १ गुण आणि साडेतीन मिनिटे राखून विजय मिळवला. तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या मुलांमधील तेलंगणा विरुध्द हरयाणा सामना बरोबरीत राहीला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!