ताज्या घडामोडी

जिजामाता, श्री स्वामी समर्थ, प्रभा भवानी यांची चंद्रोदय महिला कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी.

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई दि. ९ :- जिजामाता महिला संघ, श्री स्वामी समर्थ, प्रभा भवानी महिला संघ यांनी चंद्रोदय क्रीडा मंडळाच्या विद्यमाने आयोजित केलेल्या महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “रणसंग्राम रागीणींचा” या अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील मुरारी घाग मार्गावरील स्व. दिनकर खाटपे क्रीडांगणावर आजपासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात काळाचौकीच्या जिजामाता महिला संघाने वरळी गावातील गोलफादेवी प्रतिष्ठानचा ४४-२४ असा पराभव करीत विजयी सलामी दिली. तसे पाहाता आजचे सर्वच सामने एकतर्फी झाले. विश्रांतीपर्यंत ३०-११ अशी आघाडी घेणाऱ्या जिजामाताने विश्रांतीनंतर सावध खेळ करीत हा विजय साकारला. प्रीती हादे हिच्या धारदार चढाया, तर योगिता राऊतच्या भक्कम पकडी या विजयात महत्वाच्या ठरल्या. गोलफादेवीकडून अस्मिता जंगम, रचना म्हात्रे यांनी उत्तम प्रतिकार केला. पण विजयाच्या जवळपासही त्यांना जाता आले नाही.

दुसऱ्या सामन्यात श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने वडाळ्याच्या शिवराणा प्रताप संघाला ५३-१३असे नमवित आगेकूच केली. प्रतीक्षा खवणेकर, लेखा शिंदे यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. मध्यांताराला २२-०५ अशी आघाडी घेणाऱ्या स्वामी समर्थने उत्तरार्धात देखील तोच जोश कायम ठेवत ४० गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय मिळविला. शिवराणा प्रतापची सरिता चौधरी बरी खेळली. शेवटच्या सामन्यात प्रभादेवीच्या प्रभा भवानी महिला संघाने हिरकणी स्पोर्ट्सचा ४२-१२ असा सहज पाडाव केला. मध्यांताराला प्रभा भवानीकडे २८-१० अशी भक्कम आघाडी होती. सोनल, तेजश्री सारंग यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. हिरकणीची संध्या हाके चमकली. या स्पर्धेचे उदघाटन अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी कबड्डी खेळाडू माया मेहेर, विभागीय नगरसेविका हेमांगी वरळीकर, माजी कबड्डी खेळाडू रेखा देवकर व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माजी कबड्डी खेळाडू तारक राऊळ यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!