आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्यांच्याकरता स्वातंत्र्य मिळवले, त्याचा हेतू साध्य झाला का? : खासदार श्रीनिवास पाटील

सेवाधाम ट्रस्ट, आयोजित ,व्याख्यानमाला, समारोप.

Spread the love

ज्यांच्याकरता स्वातंत्र्य मिळवले, त्याचा हेतू साध्य झाला का? : खासदार श्रीनिवास पाटील..

सेवाधाम ट्रस्ट तर्फे आयोजित व्याख्यानमालेचा समारोप.

आवाज न्यूज :तळेगाव दाभाडे, वार्ताहर, २२ जानेवारी.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज स्वातंत्र्याचा अर्थ कळेना झाला आहे. ज्यांच्याकरता स्वातंत्र्य मिळवले, त्याचा हेतू साध्य झाला का? स्वातंत्र्याच्या पलीकडे काही घ्यायला पाहिजे, पण आज तसे होताना दिसत नाही. इतिहासाऐवजी व्यवहार बोलत आहे. त्यामुळे ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा होत असताना आम्ही काय मिळवलं, असा सवाल सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी केला. दरम्यान, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शांता कल्याणराव जाधव धोत्रे यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे खासदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे आयोजित कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्मरण बलिदानाचे’ या विषयावर खासदार पाटील बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, बबनराव भेगडे, पं. सुरेश साखवळकर, उद्योजक विशाल जाधव, कृष्णकांत वाढोकर, वर्षा वाढोकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे, अमित बांदल, मंगला कुदळे, ट्रस्टचे संस्थापक डॉ. कृष्णकांत वाढोकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, शीतल सपकाळ, उपाध्यक्ष माजी नगरसेवक निखिल भगत, डॉ. वर्षा वाढोकर, मिलिंद निकम, अतुल पवार, राजेश बारणे, मयूर भरड आदी उपस्थित होते.

खासदार पाटील पुढे बोलताना म्हणाले, की माणसाच्या मूलभूत गरजाबरोबर शिक्षण, आरोग्य, व्यापार आदी क्षेत्रात पुढे गेलो. पण विकास करताना जे विस्थापित झाले. त्यातील काही विस्थापितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. आज स्वातंत्र्यांचा विसर पडत चालला आहे. स्वातंत्र्याच्या काही वर्षानंतर काही गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या. मात्र, तसे झालेले दिसत नाही. स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करायचे की नाही ? समाज सुधारकांनी समाजातील वाईट चालीरिती बंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

पण आज त्यांच्या नावाच्या फक्त घोषणा होताना दिसतात, हे दुर्दैवी आहे. आज अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. बेरोजगारी वाढतच चालली आहे. असे असतानाही फक्त मोठमोठ्या आकड्यांच्या घोषणा होत आहेत. प्रत्यक्षात किती बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे ? स्पर्धेच्या युगात महिलांना वाव दिला पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये मुली चमकत आहेत. त्यांना जास्त प्रोत्साहन मिळायला हवे. महिलांच्या हातात कारभार दिल्यास त्या उत्कृष्ट काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात सुरेश धोत्रे म्हणाले, की सेवाधाम ट्रस्टच्या स्थापनेमागचा इतिहास सांगितला. सेवाधाम ट्रस्ट मोफत वाचनालय चालवीत आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. लवकरच ट्रस्टच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे.
सूत्रसंचालन मिलिंद निकम व राजेश बारणे यांनी, तर आभार हरिश्चंद्र गडसिंग यांनी मानले.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचे खासदार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.


स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टच्या वतीने शांता कल्याणराव जाधव धोत्रे यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका उभारण्यात आली आहे. संपूर्णपणे इकोफ्रेंडली असणाऱ्या या अभ्यासिकेचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
——————————-
ट्रस्टला आर्थिक स्वरूपात मदत
उद्योजक स्व. कृष्णकांत कुदळे यांच्या स्मरणार्थ निबंध स्पर्धासाठी आर्थिक स्वरूपात मदत व दुर्मिळ दीड हजार पुस्तके ट्रस्टला भेट देण्यात आली. तसेच डॉ. अशोकराव निकम यांच्या वतीने वित्तीय विषयावरील एकवीस हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!