महाराष्ट्र

शिवनेरीवर फडकणार १०० फूटी भगवा

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात यावा यांसह विविध मागण्यांबाबत केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी शिवनेरीवर ध्वज उभारण्यासह बहुतेक मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.असी माहिती खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी दिली

शिवनेरीवर १०० फुटी ध्वज उभारण्यासाठी भारत सरकारच्या पुरातत्व विभागास यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात येतील असे आश्वासन रेड्डी यांनी दिले.शिवरायांच्या जन्मस्थळी गेल्यानंतर तेथे स्वराज्याचे प्रतिक असणारा भगवा ध्वज नसल्याची खंत होती.याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नजिकच्या काळात शिवनेरीवर भगवा ध्वज डौलात फडकताना दिसेल.याच भेटीदरम्यान लेण्याद्रि व शिवनेरी येथील रोप वे बाबतही चर्चा केली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी ‘सीआरएफ’ मधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्याचे श्री रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी देखील पुरातत्व विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची गरज असल्याचे त्यांना सांगितले.यावर याबाबत गडकरीजी यांच्यासोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येइल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून जुन्नर तालुका विकसित करणे, भक्ती-शक्ती कॉरिडॉर अशा विविध प्रकल्पांसंदर्भातही रेड्डी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी शिवनेरी किल्ला,लेण्याद्रि डोंगरावरील बौद्ध लेणी समूह, अष्टविनायक गणपती,धरणांची साखळी,विलोभनीय सृष्टी सौंदर्याने नटलेला परिसर आदींची माहिती श्री. रेड्डी यांना दिली. भक्ती-शक्ती कॉरिडॉरची संकल्पना केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री महोदयांना आवडली.

शिवनेरी, वढु बु. तुळापूर ही ऐतिहासिक स्थळे,भीमाशंकर, लेण्याद्रि, ओझर, रांजणगाव,थेऊर हे अष्टविनायक गणपती, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असलेले श्री क्षेत्र आळंदी, निमगाव खंडोबा अशा भक्ती स्थळांचे कॉरिडॉर तयार केल्यास पर्यटनासाठी मोठी संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.असे खासदार डाॅ. कोल्हे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!