ताज्या घडामोडी

व्हॅलेंटाईन डे निमित्ताने गुड टच बॅड टच बद्दल अभिनव विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१४
व्हॅलेंटाईन डेच्या आणि सुषमा स्वराज यांच्या जयंती निमित्ताने पालघर येथील इनरव्हील क्लब तर्फे विराथन येथील अभिनव विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन आणि शाळेला संगीताचे साहित्य वितरण समारंभ सोमवारी (तारीख १४) मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदूलाल घरत होते. यावेळी बोलताना घरत यांनी मराठी माध्यमाच्या शाळांना वेळेवर शासनाचे वेतनेत्तर अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इनरव्हिल क्लब सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्यासाठी संगीताचे दिलेले साहित्य निश्चितच विद्यार्थ्यांना निरामय आणि आनंददायी शिक्षण घेण्यास उपयुक्त ठरेल असे सांगितले.

याप्रसंगी इनरव्हील क्लब पालघरच्या अध्यक्षा स्वाती पाटील यांनी कोरोनाच्या आपत्तीमध्ये वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून विद्यार्थिनींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छते बरोबरच बाह्य जगात घडणाऱ्या घटनांकडे जबाबदारीने बघावे असे सांगून इनरव्हील क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर क्लबच्या माजी अध्यक्ष वर्षा शेट्टी यांनी वयात येणाऱ्या मुलींनी कोणत्याही मोहजालात न फसता आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल सतर्क कसे राहावे हे वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले. तर ॲड. विनिता पाटील यांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच कसा ओळखावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

या वेळी पालघर इनरव्हिल क्लबच्या सचिव प्रीती पाटील, माजी अध्यक्ष प्रीती शहा,
अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा किणी, विद्या वैभव विद्यालय केळवा रोड चे मुख्याध्यापक नरेश किणी, प्रभाकर किणी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

याप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील, सूत्रसंचालन कलाशिक्षक महेंद्र पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राजक्ता किणी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!