ताज्या घडामोडी

‘विजयी भव’ शुभेच्छा देऊन इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ संपन्न

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 23 /02 /2024 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.

Spread the love

तळेगाव दाभाडे : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 23 /02 /2024 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री.सत्यजित खांडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

विद्यार्थ्यांचा बारा वर्षांचा शैक्षणिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता आयोजित केलेले विविध उपक्रम, राबविण्यात आलेले मार्गदर्शक कार्यक्रम,ज्ञानवर्धक व्याख्यानमाला यांचा आढावा आपल्या प्रास्ताविकेतून शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख यांनी सादर केला .


सदिच्छा समारंभास प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री.सत्यजित खांडगे,श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे,सहसचिव व शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे,सचिव श्री.मिलिंद शेलार सर,सल्लागार सौ.शबनम खान, शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख,पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री.सत्यजित खांडगे यांचा स्वागतपर सत्कार श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.मिलिंद शेलार सर यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख यांनी केला.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री.दादासाहेब उर्हे यांच्यातर्फे इ.दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच गतवर्षी इ. दहावी मध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु.ओम जम्बुकर यास अॕड.कु.शलाका संतोष खांडगे यांच्या स्मरणार्थ अॕड.कु. शलाका संतोष खांडगे चॕरिटेबल ट्रस्ट तर्फे अॕड. अजिंक्य बाळासाहेब शिंदे यांच्याकडून रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.


नवीन ऊर्जा घेऊन प्रत्येकाने आपले व्यक्तिमत्व सर्वगुणसंपन्न बनवावे असे प्रतिपादन वर्गशिक्षिका सौ.सुजाता गुंजाळ यांनी केले. गुरूंनी दिलेले ज्ञान अर्जित करून भारताचे सुजाण नागरिक बनावे असे वक्तव्य वर्गशिक्षक श्री.सिद्धेश सोनवणे यांनी केले.
इ. दहावी मधील कु.ओम कवळे,कु.अमृता जाधव,कु.समीक्षा तारडे,कु.भूमी पाटील, कु.अनन्या नवले, कु.नेहा साळुंखे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेप्रती आपले ऋण व्यक्त करताना विद्यार्थ्यांना भावना अनावर होत होत्या.विद्यालयाचे वातावरण भावूक झाले होते .

‘आरंभाचा प्रारंभ’ करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे. वास्तविक दहावीचा निरोप समारंभ हा निरोप नसून येणाऱ्या उज्वल भवितव्याची सुरुवात असते यासाठी आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वी व्हावे; स्वयंस्फूर्तीने कार्य करावे असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री.सत्यजित खांडगे यांनी केले.

विनय,सकारात्मकता, संवेदनशीलता,संस्काररुपी शाळेने दिलेली संपदा विद्यार्थ्यांनी जपावी; प्रयत्नांची पराकाष्टा करून विजय मिळवावा असे मनोगत शालेय समिती अध्यक्षा सौ.रजनीगंधा खांडगे यांनी व्यक्त केले.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष खांडगे यांनी तणावमुक्त पेपर सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम अबाधित राहील असा विश्वास व्यक्त करून नवीन सुरुवात करताना भूतकाळाला न विसरता भविष्यकाळाची वाटचाल करावी तसेच शाळेचा सन्मान जपून उज्वल भविष्य घडवावे अशा शुभेच्छा दिल्या.

निरोप समारंभाचे औचित्य साधून इ.दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका सौ.शमशाद शेख,पर्यवेक्षिका सौ.रेणू शर्मा,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.तेजस्विनी सरोदे,प्राथमिक विभाग प्रमुख सौ.धनश्री पाटील,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इ.नववी मधील विद्यार्थिनी कु. निधी बिराडे,कु.तेजस्विनी चव्हाण,कु.पूर्वा बवले,कु.सुरक्षा कटरे यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची गोड सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!