आपला जिल्हा

पिंपरी : अमृत भारत योजनेंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांचा विस्तार

या योजनेत मावळमधील रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.

Spread the love

पिंपरी : अमृत भारत स्टेशन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन झाले.

रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत मावळमधील रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. प्रवासी संघटनेची देखील विस्तारीकरणाची मागणी होती. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, लोणावळा या पाच स्थानकांचा योजनेत समावेश झाला. पहिल्या टप्प्यातील आकुर्डी आणि तळेगाव दाभाडे या स्थानकांचे विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.

आता अमृत भारत योजना दोन अंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण व सुधाराचे काम हाती घेतले आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, सिग्नल, दिव्यांगासाठी सोयी-सुविधा, पर्यावरणपूरक वातावरण, आवश्यकतेनुसार उद्वाहक(लिफ्ट), मोफत वाय-फाय, साफसफाई, अत्याधुनिक सूचनाप्रणाली, वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शेलारवाडी, जांभूळ व कामशेत या ठिकाणी बांधलेल्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि पोल क्रमांक ४७ मळवली स्थानकाजवळील भुयारी मार्गाच्या कामाचे भूमिपूजनदेखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!