ताज्या घडामोडी

सदा मास्तरांची कलाट विसावली!

Spread the love

लहानपणी गावांत कुणा बड्या घरात लग्न असले की हमखास रात्री वरातीला सदा मास्तरांचा बॅंड असायचा.वरात मारुतीच्या देवळाच्या चौकात येईपर्यंत १० वाजून गेलेले असायचे.गावातले लोक जेवण खाण उरकून मारुतीच्या देवळातल्या पडवीला आणि चौकात गर्दी करुन वरात येण्याची वाट बघत बसायचे.खरंतर ते वरातीची वाट बघायचे नाहीत तर सदा मास्तरच्या बॅंडची वाट बघायचे. १० वाजता चौकात यायची ते चांगले पहाटे दोन तीन पर्यंत तिथंच वरात बॅंडच्या तालावर झुलायची. संपन्न घरातल्या लग्नासाठी सदा मास्तर चा बॅंड हमखास असायचा.अधिक संपन्न असामी तर बॅंडच्या जोडीला नर्तकी असायच्या. परिस्थिती साधारण असलेल्यांना हा बॅंड परवडायचा नाही. तशी क्वालीटीच होती.

सदाशिव माने नावाच्या १५..२० वर्षांच्या उमद्या पोराने..अवलियाने सुमारे ५०..६० वर्षांपूर्वी सरुड परिसरातील चांगले कलाकार शोधून हौस म्हणून बॅंड पथकाची स्थापना केली. त्याला नाव दिले जय बजरंग ब्रास बॅंड कंपनी. स्वतः कधी कुस्ती खेळले नाही पण मास्तरांना कुस्तीची खूप आवड. त्यामुळे बजरंगाचे नाव बॅंड पथकाला..सॅारी बॅंड कंपनीला दिले.तालीम मंडळांचा गणपती आणि दरवर्षीचे कुस्तीचे मैदान ते पैसे न घेता वाजवित.ते काही शाळेतले मास्तर नव्हतेच.बॅंडमास्टर वरुन त्यांचे मास्तर हे नाव पडलेले.मितभाषी मास्तरांचे क्लारिनेट व सॅक्सोफोन वादनात प्राविण्य होते पण आपल्यातील कलेने त्यांनी क्लारिनेट…कलाट वादनात विशेष कोशल्य प्राप्त केलेले.हळूहळू त्यांच्या बॅंडपथकाचे नाव खूप गाजले. सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यात या बॅंडला ..सदा मास्तरांच्या कलाटाला कित्येक वर्षे तोड नव्हती. काही वर्षातच बॅंड इतका प्रसिध्द झाला की लोक सदा मास्तरांची मोकळी तारीख पाहुन लग्नाची तारीख ठरवायचे.सदा मास्तरांचा बॅंड लग्नात असणे हे परिसरांत प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले.
नवरा नवरी सजवलेल्या रथात बसले की सुरेल गणेशवंदनाने वादनास प्रारंभ व्हायचा.गळ्याला टाय,अंगावर थ्री पीस सूट (कोट) केसांचा कोंबडा या अवतारात शांतपणे सदा मास्तरांची कलाटीतून सूर निघू लागे.सोबतचे कलाकारही ढंगदार वेशभूषेत असत. वाजंत्री..लाईटवाले..बत्तीवाले मोठा लवाजमा असायचा.गणेशवंदनेनंतर तुकारामांच्या अभंगापासून ते जुन्या काळातील आयटम सॅंाग मुंगळा मुंगळा.. ला वरात मारुतीच्या देवळाजवळ यायची. सदा मास्तरांच्या बॅंडच्या..कलाटाच्या तालावर आबालवृद्ध..बायामाणसेही थिरकायचे..रुपेरी वाळूत माडांच्या बनातून हळूहळू वातावरण उत्तररात्रीकडे सरकायचे. पहाटे पहाटे आणखी फरमाईशी गाण्यांचा आग्रह ओलांडून मास्तर चालू लागले की सोबतचा लवाजमा हले. मध्येच लता मंगेशकरांचे‘पंख होते ते तो उड आता रे’ किंवा गुड्डी मधले ‘बोले रे पपिहरा’ व्हायचे.ते ऐकून जुन्या पिढीतला एखादा वृद्ध झोपेतून जागा होऊन चौकटीत येऊन पायाने ताल धरायचा.
लग्नाचा सिझन संपला की सदा मास्तर आपल्या पारंपारीक बांबूपासून पाट्या इ. वळण्याच्या व्यवसायकडे वळायचे पण सुपारी असो नसो खालच्या आळीतल्या बॅंडसाठी भाड्याने घेतलेल्या घरात सतत बॅंडचे प्राक्टीस चालायची.आता मुलगा बाजीराव हाताखाली आलेला. तोही उत्कृष्ट ढोलकीपटू आहे.कच्चीही चांगली वाजवतो.
उणीपुरी ५०..६० वर्षे बॅंडच्या माध्यमातून सूरसाधना करुन पर्यायाने ग्रामीण भागांत लोकांचे कान तृप्त करणारी करमणूक करुन सदा मास्तर रा.सरुड जि.कोल्हापूर हे काल वयाच्या ७५ व्या वर्षी निर्वतले. गेली दोन वर्षे घरीच होते. कोरोनामुळे अलिकडे काही कामही नव्हते पण उतारवयातही त्यांची कलासाधना सुरुच होती.त्यांच्या निधनानंतर घराबाहेर परिसरातील नव्याजुन्या बॅंडपथक कलाकरांची ही मोठी गर्दी आहे.
अशा या कोकीळकंठी बॅंडपथक कलासाधकास विनम्र श्रद्धांजली.
-पी.आर.पाटील-सरुडकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!