क्रीडा व मनोरंजन

ओम् कबड्डी प्रबोधिनीचा १८वा वर्धापन दिन व खेळाडू सन्मान सोहळा थाटात संपन्न.

Spread the love

“जीवनात कसे जगायचे ते आम्हाला कबड्डीने शिकविले.” भारत-श्री विजू पेणकर.

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई दि. ३ :- “जीवनात कसे जगायचे ते कबड्डी या खेळाने आम्हाला शिकविले” असे भावपूर्ण उदगार भारत-श्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजू पेणकर यांनी ओम् कबड्डी प्रबोधिनीच्या १८व्या वर्धापन दिन सोहळ्या प्रसंगी काढले. सनपॅरेडाईझ बिजनेस प्लाझा, ६वा मजला, कमला मिल समोर, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०००१३ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. त्यामुळे क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कबड्डीने आक्रमकता दिली, तसे बचाव करण्यासही शिकविले. प्रसंगी संयम ठेवून विजयी ध्येय कसे गाठावयाचे हे देखील दाखविले. अति आत्मविश्वासाने वागलात तर शेवटच्या क्षणी सामना आपल्या हातून कसा निसटतो हे देखील आम्ही शिकलो. असे ते पुढे म्हणाले. कबड्डीतील व बुवा साळवी यांच्याबद्दलच्या काही आठवणी सांगून पेणकर यांनी आपल्या खुमासदार भाषणाने कबड्डी रसिकांना खिळवून ठेवले. कबड्डीची पताका अहोरात्र खाद्यावर घेऊन आशिया खंडात या खेळाचा प्रसार करणाऱ्या बुवा साळवी यांचे स्मारक अद्याप झाले नाही. याची खंत शेवटी पेणकर यांनी बोलून दाखविली. याप्रसंगी कबड्डीतील जेष्ठ महिला खेळाडू सुषमा चेंबूरकर(सुषमा उमेश पाटील) व लीला पाटील(लीला शशिकांत कोरगावकर) आणि जेष्ठ पुरुष खेळाडू सुनील डकरे व सुरेश मोरे या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तर वयोवृद्ध महान खेळाडू वसंत ढवण आणि हाडवैद्य व कबड्डी खेळाडू जगन्नाथ(मामा) वलखाडे यांना कबड्डीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी विभागीय आमदार सुनील शिंदे म्हणाले की, ” लहान असताना ज्यांचा खेळ आम्ही मैदानात पाहिला त्या महान खेळाडूंशी प्रत्यक्ष भेटण्याची संधी ओम् कबड्डी प्रबोधिनी आम्हाला देते त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांना माझ्याकडून सदैव सहकार्य मिळत राहील. सचिनभाऊ अहिर  यांनी आपल्या भाषणात आपण कबड्डीकडे कसे वळलो व बुवांच्या कबड्डीतील कार्याच्या गौरवा संबंधीचा उल्लेख केला आणि प्रबोधिनीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. भारत-श्री व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विजू पेणकर, विभागीय आमदार सुनील शिंदे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी साताऱ्याचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विजय जाधव, कबड्डीतील टायगर व शिवछत्रपती वसंत सूद, महिलातील पहिल्या शिवछत्रपती चित्रा नाबर-केरकर, शैला रायकर, आनंदा शिंदे, मेघाली कोरगावकर, मनोहर साळवी (सर्व शिवछत्रपती पुरस्कार), माजी राष्ट्रीय खेळाडू रवींद्र सुर्वे, हेमा रायकर, नगरसेविका युगंधरा साळकर, जेष्ठ समालोचक राणाप्रताप तिवारी, राष्ट्रीय खेळाडू रमा पवार, किशोरी कोळेकर (पुणे), लता कंटक, मुंबई शहरचे उपकार्याध्यक्ष अनिल घाटे, सहकार्यवाह शरद कालंगण, सचिंद्र आयरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अजय पेंडुरकर यांनी, प्रास्ताविक सरचिटणीस जीवन पैलकर यांनी, तर उपस्थित व पाहुण्यांचे आभार प्रदर्शन शशिकांत राऊत यांनी केले.

१) पुरस्कार विजेते :- डावीकडून सुषमा उमेश पाटील(चेंबूरकर), जगन्नाथ(मामा) वलखाडे(विशेष पुरस्कार), लीला शशिकांत कोरगांवकर(पाटील), वसंत ढवण(विशेष पुरस्कार), सुरेश मोरे व शेवटी सुनील डकरे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!