क्रीडा व मनोरंजन

वाटद केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप वाटद कवठेवाडी शाळेकडे

Spread the love

वाटद मिरवणे केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न

खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील वाटद मिरवणे केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच वाटद रायवाडी शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये वाटद केंद्रातील सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले.
या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये वाटद केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेने यश संपादन करत केंद्रासाठी असलेली जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी आपल्या शाळेकडे खेचून आणण्यात यश मिळविले आहे.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सकाळ सत्रात वाटद ग्रामपंचायतच्या सरपंच अंजली अनंत विभुते यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. त्यानंतर दिवसभर चाललेल्या या क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेने मुलींनी खो – खो, कबड्डी व लंगडी या सांघिक खेळामध्ये केंद्रामध्ये प्रथम विजेतेपद पटकावले तर मुलांनी खो – खो मध्ये विजेतेपद आणि कबड्डीमध्ये उपविजेतेपद पटकावून सर्वच सांघिक खेळामध्ये आक्रमतेच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
तर वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये मुलांनी धावणे प्रकरणात प्रथम व द्वितीय, उंच उडी मध्ये प्रथम व द्वितीय, गोळाफेक, लांब उडी व थाळीफेक या क्रीडा प्रकारात द्वितीय प्रथम क्रमांक पटकावले. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात मुलींनी थाळीफेक या क्रीडा प्रकारात यश संपादन केले.
या सर्व क्रीडा प्रकारातील एकत्रित गुण करून मिळालेल्या गुणांच्या आधारे केंद्रस्तरीय जनरल चॅम्पियनशिप चषक प्रथमच वाटद कवठेवाडी शाळेने आपल्या शाळेकडे मिळविण्यात यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल पंचायत समिती रत्नागिरी अंतर्गत गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर, वाटद मिरवणे केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल पवार, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते आबा सुर्वे, माजी शिक्षक किंजळे सर, यांच्यासह उपस्थित सर्वांनीच अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाटद रायवाडी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र जोशी, उदय रहाटे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती, वाटद रायवाडी, किंजळेवाडी, वडवली, बौद्धवाडी आणि परटवणे मधील सर्व ग्रामस्थ, पालकांनी प्रचंड मेहनत घेतली. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केंद्रप्रमुख अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा जिर्णोद्धार समिती अध्यक्ष अप्पा धनावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे, उपाध्यक्षा वैशाली कुर्टे, रमेश तांबटकर, विश्वनाथ शिर्के यांच्यासह पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!