आरोग्य व शिक्षण

अंतर्गत रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ : आमदार सुनिल शेळके

Spread the love

तळेगाव दाभाडे : तळेगावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी कॉंक्रीटचे रस्ते करण्याचा नगरपरिषदेने ठराव करा. त्यासाठी लागणारा ५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी राज्यसरकारच्या माध्यमातुन उपलब्ध करून देऊ, असे वक्तव्य आमदार सुनिल शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील समस्या व विकासकामे या संदर्भात मंगळवारी (दि.१३) तळेगाव नगरपरिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत केले.

यावेळी विरोधीपक्ष नेते गणेश काकडे, नगरसेवक गणेश खांडगे, संतोष भेगडे,अरुण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आणि सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शेळके  म्हणाले कि, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील भुयारी गटार व पाणी योजना यांचे नियोजन करून लवकरात लवकर कामे पूर्ण करा,तसेच तळेगाव स्टेशन भागासाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आंद्रा धरणातून थेट पाईप लाईन आणण्यासाठी नगरपरिषदेने ठराव करून प्रस्ताव तयार करा. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी माझी असेल. तळेगाव नगरपरिषदेने विकासकामांसाठीचे ठराव करून दिले तर त्यासाठी निधी उपलब्ध करून देता येईल, मात्र तळेगाव नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांना विकास कामांसंदर्भात गांभीर्य नसल्याने ते आज आले नसल्याचा टोला देखील यावेळी आमदार शेळके यांनी लगावला.

तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतून जाणाऱ्या तळेगाव-चाकण रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून वेळोवेळी नगरपरिषदेस या रस्त्यालगतचे विद्युत खांब काढण्यास सांगून देखील नगरपरिषदेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रस्त्यावरील खांबांमुळे जर कोणाचा अपघात झाला तर त्यास सर्वस्वी नगरपरिषदेतील सत्ताधारी जबाबदार असतील असेही ते म्हणाले. तळेगाव नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी लोणावळा नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांचा आदर्श घ्यावा व राजकीय जोडे बाजूला ठेऊन आढावा बैठकीपासून पळ काढण्यापेक्षा विकासासाठी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक होते.

तळेगाव नगरपरिषदेत घेतलेल्या आढावा बैठकीत आमदारांनी कर वसुली, आरोग्य विभागाकडून सुरु असलेली कामे, क्रीडा संकुल,गॅस शवदाहिनी इत्यादी अनेक कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरपरिषदेतील भाजपचे सत्ताधारी उपस्थित नसल्याने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी त्यांचा निषेध केला. तसेच विकासकामांबाबत सत्ताधारी यांच्याकडून विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या वार्डात कामे केली जात नाहीत, विकासकामांबाबत दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी यावेळी मांडल्या.

या आढावा बैठकीत तळेगाव नगरपरिषदेच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवकांनी आमदार शेळके यांचा सन्मान केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!