महाराष्ट्र

महागाई,बेरोजगारीवरून लक्ष हटविण्या साठी जातीय तणाव वाढविला जात आहे.

Spread the love

इस्लामपूर दि.९ प्रतिनिधी
महागाई,बेरोजगारीवरून लक्ष हटविण्या साठी जातीय तणाव वाढविला जात आहे. कोणाला तरी सुपारी देवून भोंग्याबद्दल बोलायला सांगितले जात आहे. भोंगा हा काय विषय आहे? गॅस सिलेंडर हजारच्या वरती गेला. पेट्रोल १२२ रुपयांच्यापर्यंत पोचले. या देशात खरा प्रश्न पोटाचा आहे,या शब्दात राज्याचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री ना.जितेंद्र आव्हाड यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
इस्लामपूर येथील ईदगाह मैदान व शादीखान्याच्या अडीच कोटी रुपयांच्या कामाच्या शुभारंभ समारंभात ते बोलत होते. राज्याचे जलसंपदा मंत्री,जिल्ह्याचे पालक मंत्री ना.जयंतराव पाटील,ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ प्रामुख्याने उपस्थित होते.
या कामाचा पाठपुरावा केल्याबद्दल माजी नगरसेवक पिरअली पुणेकर,ईदगाह मैदान शेजारची जमीन दिल्याबद्दल आदिनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
ना.आव्हाड पुढे म्हणाले,दोन्ही समाज अतिशय सामंजस्याने वागले. त्यामुळे त्याने अपेक्षित असे तीन तारखेला काहीच झाले नाही. खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या घरावर केवळ चालून जाण्याचा प्लॅन नव्हता. घरात फक्त तीन माणसं होती. जर योग्य वेळी घराची दारे बंद केली नसती,तर अनर्थ घडला असता. तो पागल सदावर्ते म्हणतो,गांधीने देशाचे वाटोळे केले आणि नथुराम घोडसेचा जी असा उल्लेख करतो. म्हणजे तो कोणत्या विचारांची भाषा बोलतो,तो कोणाचा हस्तक आहे,हे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महा राजांची लढाई मुस्लिम विरोधी नव्हती. त्यांनी आग्र्याला मदारी मेहत्तरला नेला.अफजल खान चा वकील कोण होता,कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. दिल्लीवरून स्वारीस आलेले मिर्झा जयसिंग कोण होते? मुस्लिम समाजाने मुलांना,मुलींना शिक्षण द्यावे. उर्दू शाळेबरोबर इंटरनॅशनल स्कुलचा आग्रह धरा. मुलांना इतर मुलांच्याप्रमाणे इंग्रजी,मराठी आले,तरच मुले स्पर्धेत पुढे येतील.
ना.मुश्रीफ म्हणाले,गेल्या काही महिन्यां पासून आपल्या समाजाला उचकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र आपण संयमाची भूमिका घ्यायला हवी. आपल्या राज्यात जातीय दंगे घडविण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेनेच हाणून पाडला आहे. महाविकास आघाडीच्या योजनांचा लाभ घ्या. मुलांना चांगले शिक्षण देवून पुढे आणा.
ना.पाटील म्हणाले,ज्यांना परत सत्तेत येण्याचा विश्वास नाही,ते आपल्या राजकीय हितासाठी जातीय तणाव वाढवित आहेत. मात्र सर्व धर्म,जाती गुण्यागोविंदाने एकत्र नांदायला हव्यात,ही आमची भूमिका आहे. यासाठी लागेल,ती किंमत आम्ही मोजू. ईदगाह मैदानास जागा कमी पडत असल्याने आपण शेजारची जागा घेतली आहे. येथे शादी खाना बांधण्यास अडीच कोटीचा निधी आणला आहे. आपल्या समाजाने माझ्यावर केलेल्या प्रेमाची थोडीशी उतराई होण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, पै.भगवान पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,कराडचे माजी उप नगराध्यक्ष फारूक पटवेकर,अझहर जमादार यांची भाषणे झाली.
अँड.चिमणभाऊ डांगे,मुख्याधिकारी वैभव साबळे,बाळासाहेब पाटील,विजयराव पाटील,खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, सुभाषराव सुर्यवंशी,दादासो पाटील,देवराज देशमुख,मुकुंद कांबळे, हाफिज जावेद,आयुब हवलदार,रोझा किणीकर,मासुम गणिभाई, हिदायतुला जमादार,शकील जमादार यांच्यासह मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.सूरज चौगुले यांनी सूत्र संचालन केले. अबिद मोमीन यांनी आभार मानले.इस्लामपूर येथील ईद गाह मैदान व शादी खाना कामाच्या शुभारंभ समारंभात बोलताना ना.जितेंद्र आव्हाड. समवेत ना.जयंतराव पाटील,ना.हसन मुश्रीफ, मुनीर पटवेकर,पिरअली पुणेकर,पै.भगवान पाटील,फारूक पटवेकर व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!