क्रीडा व मनोरंजन

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा सी गेम्सच्या तांत्रिक समितीत चेतन पाठारे आणि विक्रम रोठे

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, दि.१८ (क्री.प्र.)- भारतीय शरीरसौष्ठवाला जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त व्हावा म्हणून धडपडणारे चेतन पाठारे आणि विक्रम रोठे या द्वयीने महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नुकत्याच व्हिएतनाम येथे झालेल्या दक्षिणv पूर्व आशियाई (सी गेम्स) स्पर्धेच्या शरीरसौष्ठव खेळाचे तांत्रिक समिती प्रमुख ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांच्यावर सोपविण्यात आली होती तर भारतीय शरीरसौष्ठवाचे कायदेशीर सल्लागार ऍड. विक्रम रोठे यांनी आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून स्पर्धेचे काम पाहिले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या तांत्रिक समितीच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच भारतीय संघटकाची वर्णी लागली होती. जागतिक संघटनेचे सरचिटणीस पद भूषवून इतिहास घडविणाऱ्या पाठारेंनी सी गेम्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली.

दर दोन वर्षांनी होणाऱ्या दक्षिण पूर्व आशियाई खेळात थायलंड, म्यानमार, फिलीपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, कंबोडिया, सिंगापूर, तिमोर लेस्ट, लाओस आणि व्हिएतनाम या 11 देशांचा समावेश होता. तसेच शरीरसौष्ठव प्रकारात व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, मलेशिया आणि लाओस या देशांतील 80 खेळाडूंनी आपले पीळदार प्रदर्शन केले. या देशांतील तगड्या खेळाडूंनी स्पर्धेत उतरल्यामुळे जेतेपदासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. या स्पर्धेच्या जजेस समितीच्या सचिवपदाची धुरा रोठे यांनी वाहिली.

डब्ल्यूबीपीएसएफचे अध्यक्ष दातुक पॉल चुआ आणि चेतन पाठारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या मान्यतेने झालेल्या सी गेम्सच्या शरीरसौष्ठव स्पर्धेची जबाबदारी व्हिएतनाम आयोजन समितीने जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टस् फेडरेशन (डब्ल्यूबीपीएफ) आणि आशियाई शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टस् फेडरेशनला (एबीबीएफ) दिली. त्यामुळे जागतिक पातळीवर डब्ल्यूबीपीएफ आणि एबीबीएफची विश्वासार्हता वाढल्याचे चित्र दिसले असून भारतातील शरीरसौष्ठवपटूंनी या संघटनेशी संलग्न असलेल्या भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या (आयबीबीएफ) स्पर्धेत खेळावे आणि खेळाबरोबर स्वताचा दर्जा उंचवावा, असे आवाहन संघटनेचे कायदेशीर सल्लागार विक्रम रोठे यांनी केले आहे.

तसेच आयबीबीएफचे आश्रयदाते आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव सुनील देवधर यांनीही पाठारे आणि रोठे यांचे कौतुक केले असून भारतात खेळाच्या प्रगतीसाठी आपण जोरदार प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिले. आयबीबीएफमध्ये खेळणारा खेळाडूच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरतोय. त्यामुळे देशभरातील सर्व खेळाडूंनी याच संघटनेप्रती आपले कर्तव्य बजवावे, असा मोलाचा सल्ला देवधर यांनी सर्व खेळाडूंना दिला.

फोटोओळ: सी गेम्सच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तांत्रिक समितीचे प्रमुख चेतन पाठारे आणि विक्रम रोठे यांच्या समवेत जागतिक संघटनेचे अध्यक्ष दातुक पॉल चुआ आणि व्हिएतनाम शरीरसौष्ठव आणि भारोत्तोलन संघटनेचे अध्यक्ष लुओंग होआंग झुआन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!