आरोग्य व शिक्षण

कलापिनीचा दिवाळी पहाटचा रौप्यमहोत्सव ‘उजळले आठवणींचे दीप’ उत्साहात संपन्न

Spread the love

तळेगाव : मावळ तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी होणारी ‘कलापिनी दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम गेली २ वर्ष करोनामुळे खंड न पडता ऑनलाइन पद्धतीने पार पडत प्रेक्षकांचं कौतुक मिळवतच होता. पण यंदाच्या वर्षी मात्र प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्था तळेगाव दाभाडे प्रस्तुत ‘उजळले आठवणींचे दीप’ रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.

१९९७ साली “दिपावली सुप्रभात” या नावाने सुरू केलेल्या या कार्यक्रमाने आज “उजळले आठवणींचे दीप” असं म्हणत गेल्या २५ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. जवळपास ७५ हुन अधिक स्थानिक कलाकारांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला होता. हिंदविजय नागरी पतसंस्थेचे संस्थापक मा. रवींद्र दाभाडे व अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे आणि त्यांचे संचालक मंडळ ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. रवींद्र दाभाडे यांनी कलापिनीच्या नवीन वास्तू प्रकल्पासाठी अनेक शुभेच्छा देऊन मदत करण्याचे आव्हान केले. या प्रसंगी वास्तूविशारद जितेंद्र पावगी तसेच स्कॉटलंड महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मा. प्रसाद बोरकर यांचा सुरेश साखवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कलापिनीचे अध्यक्ष मा.विनायक अभ्यंकर आणि कार्यध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले.

‘पूर्वेच्या देवा तुझे’ या सूर्य देवाच्या उपासनेच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अक्षय म्हाप्रळकर या तरुणानी हे गीत गाऊन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यांनतर विनायक लिमये, विराज सवाई, नेहा तापिकर, कीर्ती घाणेकर यांनी अमृतराय रचित गणपतीची स्तुती करणारं कटाव हे वृत्त सादर केलं. कटाव हे वृत्त गद्य आणि पद्याच्या सीमारेषेवर एकाचवेळी वावरतं. त्याला मराठी ब्रेथलेस म्हणता येईल. असं हे कटाव वृत्त कलाकारांनी अत्यंत ताकदीने प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांचा भरघोस प्रतिसाद मिळवला. त्याचबरोबर देवी शारदेची स्तुती करणारं स्तोत्र आणि संत ज्ञानेश्वरांचा ‘मन हे झाले’ हा विठ्ठलाची स्तुती करणारा अभंग ऐकून सर्वांची मनं विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन गेली.

संपदा थिटे, शुभदा आठवले, ऋतुजा उगीले, धनश्री शिंदे, डॉ. प्राची पांडे, प्राची गुप्ते, स्नेहल दिवेकर या कलापिनीच्या गुणी कलाकारांनी अहिरभैरव रागातील सरगम, बंदिश, तसेच हेमंत आठवले यांनी जय शंकरा हे नाट्यगीत सादर करत आपल्या मधुर गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आजच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलेलं ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या कन्नड भाषेतील सुंदर रचनेवर मीनल कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्या शरयू पवनीकर, सुप्रिया नायर, प्रणोती पंचवाघ, तेजस्विनी गांधी यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. या रचनेत संत पुरंदरदासांनी महालक्ष्मीला साकडं घातलं आहे. अष्टलक्ष्मींच्या रुपाचं दर्शन अश्या या मंगलप्रसंगी सगळ्यांना घडलं. वैजयंती बागुल यांनी बैरागी भैरव या रागात गायन करत आपल्या आवाजाची भुरळ प्रेक्षकांना घातली. त्यांना समर्थपणे तबल्याची साथ त्यांचे पती केदार बागुल यांनी केली. संपदा थिटे आणि शुभदा आठवले या भगिनींनी नाट्यगीतमाला सादर केली. त्याने मन आनंदाने आणि समाधानाने वाहू लागले. काही वर्षांपूर्वी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं निवेदन नेहमीसारखं न करता कवितेतून करण्याची संकल्पना अंजली कऱ्हाडकर यांनी प्रत्यक्षात आणून कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली होती. आणि आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी मी राधिका या गाण्याचे निवेदन राधा-कृष्णाच्या कवितेतून करून प्रेक्षकांना भावुक केले. आणि शिवानी कऱ्हाडकर यांनी आपल्या मधुर आवाजात गाणं गात एक माहोल बनवला. कलापिनी बालभवनच्या प्रशिक्षिका मधुवंती रानडे यांनी बसवलेले बालचमुंचे उत्तम बालगीत सादर झाले.यासाठी अवनी कदम, वृंदा पुंडलिक, गायत्री घाणेकर, अवनी परांजपे, आर्या परांजपे या बालकलाकारांनी गायन केले तसेच गार्गी लंभाते, अबोली शिंदे, आयुषी लंभाते, स्पृहा मखामले, आराध्या गांधी, अवनी आचार्य, दुर्गा पोलावर, आभा पळसुळे, गौरी पोलावर यांनी यावर नृत्यही सादर केले. कलापिनीच्या गायक कलाकारांनी देशभक्तीपर गीतमाला सादर करून सैनिकांप्रती आणि देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आजही तितक्याच आवडीने ऐकलं जाणारं नाट्यगीत ‘प्रिये पहा’ हे सुरेश साखवळकर सरांनी गात प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला. ‘तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या’ या उषा धारणे, रेखा रेंभोटकर यांनी गायलेल्या गाण्यावर हस्ययोगाच्या जेष्ठ कलाकार अनघा बुरसे, श्रीपाद बुरसे, रश्मी पांढरे, रवींद्र पांढरे, किसन शिंदे, पांडुरंग देशमुख, दीप्ती आठवले, दीपक जयवंत यांनी आरोग्याचं महत्व सांगत अत्यंत सुंदर नृत्य सादर केले. सगळ्या जेष्ठ कलाकारांनी तरुणांच्या जोशाला टशन देत वन्स मोअर मिळवला.

अनुजा झेंड, सिद्धी शहा, अदिती अरगडे, अंकिता कुचेकर, स्फूर्ती शहा, समा भावसार, मुक्ता भावसार, शामली देशमुख या कलाकरांनी ‘रुणझुणत्या पाखरा’ या गाण्यावर खूप छान नृत्य सादर केले. सावनी परगी आणि लीना परगी या माय-लेकींनी ‘नयनांच्या महाली’ लावणी गात कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. त्याच्या संगतीने मंगेश राजहंस यांनी दिलेल्या ढोलकीच्या साथीने त्याला चार चांद लावले. गेली अनेक वर्ष आपल्या रांगड्या सादरीकरणाने लक्ष वेधून घेणाऱ्या विपुल परदेशी, अविनाश शिंदे आणि त्यांचे सहकारी यश गव्हाणे, प्रशांत धुळेकर, हृषीकेश कठाडे, नयन शिरोळकर, सानिका चव्हाण, इशा नवले यांनी याही वर्षी ग्रामीण ढंगाचे ‘सुंबरान’ आणि ‘काठी न घोगडं घेऊ द्या की हो’ या गाण्यांवर जोरकस जोशात नृत्य सादर केले. सगळ्यांनी केलेली उत्कृष्ट वेशभूषा लक्ष वेधून घेणारी ठरली. खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांनाही जागीच ताल धरायला या नृत्याने भाग पाडले. त्यानंतर भैरवी झाली व दरवर्षी प्रमाणे कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व कलाकारांनी एकत्र मंचावर येऊन तसेच प्रेक्षकांनी त्यांच्या जागेवर बसून ‘सर्वात्मका सरवेश्वरा’ ही प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सांगता झाली आणि पुढील सुवर्ण महोत्सवी वाटचालीची नांदी झाली. हा कार्यक्रम ज्यांच्या उत्तम साथ संगतीमुळे रंगला ते म्हणजे कलापिनीचे वादक कलाकार शुभदा आठवले, प्रदीप जोशी(संवादिनी), प्रवीण ढवळे, अनिरुद्ध जोशी(ताल वाद्य), सचिन इंगळे(ढोलकी), राजेश झिरपे(सिंथेसायझर).

या संपूर्ण कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, डॉ. विनया केसकर, आकाशवाणीचा कलाकार विराज सवाई यांनी उत्तमपणे आपल्या खांद्यांवर पेलली. स्व.श्री.शिरीष अवधानी लिखित ‘होती मनोहर ती’ , ‘स्वर्गीय आप्पा धोपावकर – एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मा. कैलास भेगडे यांच्या हस्ते ‘नव्हाळी दिवाळी अंकाचे’ प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपस्थित असलेले मान्यवर योगिता अवधानी पाटील व प्रशांत दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कलापिनी कलाकार मीनल कुलकर्णी व दिनेश कुलकर्णी यांच्या सृजन नृत्यलयाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अश्या ह्या दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाच्या सजावटीची जबाबदारी प्रतीक मेहता,चेतन पंडित, संदीप मनवरे, स्वच्छंद गंदगे, सायली रौंधळ आणि अन्य तरुण कलाकार तसेच बालभवन आणि कुमारभवन च्या प्रशिक्षिका ज्योती ढमाले,केतकी लिमये,सुप्रिया खानोलकर, यांनी उत्तमपणे सांभाळली.

छान रांगोळी दिपाली जोशी,आरती पोलावार आणि प्रीती शिंदे यांची होती. चेतन पंडित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेले २५ वर्षाचा आढावा घेणारे छायाचित्रांचे आणि वर्तमान पत्रातील कात्रणांचे प्रदर्शन रसिकांचे लक्षवेधून घेत होते. ध्वनिसंयोजनाची जबाबदारी सुमेर नंदेश्वर आणि सहकाऱ्यांनी सांभाळली.

तसेच गेली २५ वर्ष छायाचित्रणाची जबाबदारी हितेश मधु शिंदेयांनी नटराज फोटो स्टुडिओ तळेगावच्या माध्यमातून  खुप छान सांभाळली आहे.

कुठलीही प्रसिद्ध प्रथितयश व्यक्ती न आणता स्थानिक कलाकारांनी मिळून केलेला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम हेच विशिष्टय असलेला कलापिनी दिवाळी पहाट या कार्यक्रमांनी यंदाच्याही वर्षी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम ठेवले आणि या पुढेही कायम राहील याची ग्वाही दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!